वाळूतस्करांना ‘टिप’ देणारे ते दोन कोतवाल कोण?

admin 3 Min Read
3 Min Read

– सिंदखेडराजा महसूल प्रशासनातच ‘झारीतील शुक्राचार्य’; दोन कोतवालांचे सीडीआर तपासण्याची गरज!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी वाळूतस्करी मोडित काढण्याचे आदेश दिले असले तरी, सिंदखेडराजा तहसील कार्यालयातच झारीतील शुक्राचार्य असल्याचा संशय निर्माण झाला असून, वाळूतस्करांना कारवाईपूर्वीच टिप देणारे ते दोन कोतवाल कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन संशयास्पद कोतवालांच्या सीडीआरची तपासणी करावी, अशी चर्चाही सुरू असून, यासंदर्भात महारखेड येथील सरपंचपती व शिवसेना तालुका संघटक म्हसाजी वाघ यांनी उपविभागीय अधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदनदेखील दिलेले आहे.

उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन देताना म्हसाजी वाघ.

सिंदखेडराजा महसूल विभागात बहुतांश अधिकारी चांगले व प्रामाणिक असले तरी काही भ्रष्ट कर्मचार्‍यांमुळे तहसील कार्यालय बदनाम होत आहे. वाळूतस्करांविरोधात कारवाई करण्यासाठी बैठे पथक जात असताना वाळूतस्करांना टिप दिली जात असून, त्यामुळे सावध झालेले वाळूतस्कर वाहनांसह पळून जातात व लपून बसतात, त्यामुळे या बैठे पथकाला कारवाई करता येत नाही. या टिप प्रकरणी दोन कोतवालांवर संशय निर्माण होत असून, त्यांच्या सीडीआरच्या तपासणीची गरज निर्माण झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पासह नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी सुरू असून, सिंदखेडराजा व देऊळगावराजा तहसीलदारांच्या हद्दीत खुलेआम हा प्रकार सुरू आहे. त्यातून कोट्यवधी रूपयांचा शासन महसूल बुडत असून, हे कोट्यवधी रूपये अनैतिक मार्गाने काही अधिकारी व कर्मचारी यांच्या खिशात जात असल्याची चर्चा आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी धडाकेबाज कारवाई करत वाळूतस्करांना दणके दिले आहेत. परंतु, नंतर मात्र बैठे पथकांना कारवाई करून वाळूतस्करी रोखता आली नाही. त्यातच, शेळगाव आटोळ येथे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनाच चिरडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे वाळूतस्करांना पाठीशी घालून शासनाचा महसूल बुडविणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील महारखेड येथील सरपंचपती व शिवसेना तालुका संघटक म्हसाजी वाघ यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनादेखील देण्यात आलेले आहे.


ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना म्हसाजी वाघ म्हणाले, की रेतीने भरलेले चार टिप्पर अडवून तहसीलदार अजित दिवटे यांना फोन केला होता. पण, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर सोडून द्यावे लागले. तहसीलदार व त्यांचे सहकारी कोतवाल यांच्याविरोधात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सर्व झालेला प्रकार कथन करून तक्रार दाखल केली आहे. मात्र या दोन सहकारी कोतवाल कोण? हे फक्त महसूल विभाग व रेतीतस्करांना माहिती आहे.

Share This Article
Exit mobile version