तब्बल पाच लाख ‘लाडक्या बहिणीं’ना ‘लाडके भाऊ’ झाले बेईमान?

admin 4 Min Read
4 Min Read

– निवडणुकीत मते घेतली, अन् आता नियमांवर बोट ठेवून पैसे देण्यास नकार!
– लाडक्या बहिणींच्या मनातील खदखद! घरी गाडी असली तरी पैसे केले बंद!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – ऐन विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू करून, व त्याद्वारे महिलांना तडकाफडकी दीड हजार रूपये देऊन महिलांची मते मिळवणारे ‘लाडके भाऊ’ आता या ‘लाडक्या बहिनीं’ना बेईमान झाल्याची भावना या महिलांतून व्यक्त होत आहे. आता नियमांवर बोट ठेवून तब्बल पाच लाख महिलांचे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ”फसलो”, अशा प्रतिक्रिया महिलांतून व्यक्त होत असून, ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात भाजप, शिंदे गट व अजित पवार गटाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ‘राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही ३ हजार रूपये देऊ’ असे आश्वासन राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनी दिले होते. परंतु, त्यावर विश्वास न ठेवता, ‘आमचं सरकार आलं, तर ही योजना पुढेही अशीच सुरू राहील आणि महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ’, असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आता घोर फसवणूक झाल्याची भावना या पाच लाख महिलांत निर्माण झाली आहे.

महिला लाभार्थ्यांच्या पात्र-अपात्रतेविषयी करण्यात आलेल्या छाननीनंतर, अपात्र ठरलेल्या ५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या, २८ जून आणि ३ जुलै २०२४ च्या आदेशानुसार, निश्चित करण्यात आलेल्या निकषांत न बसणार्‍या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यानुसार, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २ लाख ३० हजार महिला, वय वर्षे ६५ पेक्षा अधिक असलेल्या १ लाख १० हजार महिला, कुटुंबात चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणार्‍या महिलांची एकूण संख्या एक लाख ६० हजार इतकी आहे. ह्या महिला वगळता, इतर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. तर. लाभार्थी महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी गाडी आहे का? त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त तर नाही ना? याचा तपास आता अधिकाऱ्यांकडून केला जातोय. यामध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. संबंधित महिलांना आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच त्यांना देण्यात आलेली आर्थिक मदत सरकार परत घेणार नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

“लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा होता. पण नंतरच्या काळात आपल्याला वेळ कमी पडला. आम्ही जून महिन्यात योजनेची घोषणा केली. आम्ही ऑगस्टमध्ये जुलै-ऑगस्टचे पैसे दिले. सप्टेंबरला त्या महिन्याचे पैसे दिले. ऑक्टोबरला ऑक्टोबर-नोव्हेंबरचे दिले. असे सलग पाच महिने पैसे दिले. ते पैसे देत असताना बारकाईने सर्व नियम तपासायला वेळ मिळायला होता. पण दुर्दैवाने तेवढा वेळ आम्हाला वेळ मिळाला नाही”, असं अजित पवार म्हणाले.


या महिलांचे झाले पैसे बंद..

  • संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २ लाख ३० हजार
  • वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १ लाख १० हजार
  • कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणार्‍या महिला – १ लाख ६० हजार
  • एकूण अपात्र महिला – ५ लाख
    —————-
Share This Article
Exit mobile version