– कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना जन्मदिनी लोककलावंत प्रबोधन परिषदेकडून निवेदन – कलावंतांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार; ना. आकाश फुंडकर यांची ग्वाही!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील सांस्कृतिक वारसा जपणारे व विविध लोककलेद्वारे समाजप्रबोधन, जनजागृती करून सामाजिक स्वास्थ्य निकोप ठेवणार्या तमाम लोककलावंताच्या संविधानिक न्याय हक्क मागण्याचे लेखी निवेदन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय संविधान प्रत, पुष्पगुच्छ भेट देऊन शुभेच्छांसह ‘लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य’ या राज्यस्तरीय लोककलावंत संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे. लोककलावंतांच्या घरकुलासह मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यासह इतर मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष शाहीर डी. आर. इंगळे, राज्य समन्वयक प्रा. गजेंद्र गवई, संचालक सदस्य शाहीर कविनंद गायकवाड, संचालिका सुनिता खरात, डॉ. रामेश्वर खरात यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की लोककलावंत प्रबोधन परिषद ही सर्व जिल्ह्यातील भारत सरकार व महाराष्ट्र शासनच्या पॅनलवर निवड झालेल्या कलापथक, कला संचाची नोंदणीकृत राज्यस्तरीय शिखर संघटना असून, हजारो लोककलावंत सदस्य कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे विविध क्षेत्रात, कारखाने, कंपन्यांमध्ये कार्यरत असणार्या कामगार यांच्यासाठी कामगार मंत्रालयाच्यावतीने त्यांची नोंद शासन दरबारी करून त्यांना शासनाच्या विविध योजना दिल्या जातात, त्याच धर्तीवर कलावंतसुद्धा कला सादर करून समाजाला प्रबोधित करून जनजागृती करून निकोप समाज निर्मितीचे कार्य करत असतो. त्यामुळे त्यांची शासनाच्यावतीने ग्रामपंचायतस्तरावर प्रत्येक गावात सर्व्हे करून नोंद करण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यातील वृद्ध कलावंत मानधन समितीमध्ये लोककलावंत प्रबोधन परिषदेचे अनुभवी, तज्ञ, कलावंत पदाधिकारी सदस्य यांची नियुक्ती करावी, ज्यामुळे खरे कलावंत मानधनासाठी निवडले जातील, घरकुल योजनेच्या लाभासाठी कलावंत यांच्यासाठी राखीव घरकुल असावी, सन २०२३-२०२४ मध्ये निवड झालेल्या वृद्ध लोककलावंत यांना त्वरित मानधन अदा करावे, कलावंताना एसटीमध्ये मोफत प्रवास करण्याची सूट देण्यात यावी, शासनाच्यावतीने स्थानिक लोककलावंत यांच्यासाठी तालुका, जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करून कला सादरीकरण करणेसाठी स्टेज उपलब्ध करून संधी देण्यात याव्यात, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्यावतीने सर्व विभागातील योजना प्रकल्प, उपक्रम यांचा प्रचार प्रसाराचे कार्यक्रम जिल्ह्यातील नोंदणीकृत व कार्यरत कलापथक कला संच यांना सादरीकरण करणेसाठी देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, वाढत्या महागाईनुसार निवड झालेल्या वृद्ध कलावंत यांना मासिक मानधन १० हजार रूपये करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या असून, कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर हे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनातील मागण्याच्या पूर्ततेसाठी संबंधित विभागाला कळविण्यात येईल व सदैव महाराष्ट्रातील तमाम लोककलावंताच्या संविधानिक न्याय हक्कासाठी पाठपुरावा केला जाईल, असे मंत्री फुंडकर यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले. निवेदनावर कार्याध्यक्ष शाहीर डी. आर. इंगळे, राज्य समन्वयक प्रा.गजेंद्र गवई, संचालक शाहीर कविनंद गायकवाड, संचालिका सुनिता खरात, रामेश्वर खरात यांच्या स्वाक्षर्या आहेत.