कुंभमेळ्याला जाणार्‍या हिंदूभाविकांची पोलिसांकडून नागपुरात लूट?

admin 2 Min Read
2 Min Read

– चिरीमिरीखोर पोलिसांमुळे डागाळतेय देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू येथील भाविकांना प्रयागराज येथे जाताना नागपूर येथून जावे लागते. या भाविकांना जातांना आणि येताना महाराष्ट्र पोलिसांना चिरीमिरी दिल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी भाजपचे सरकार आहे. त्यातही रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याच नागपुरात त्यांचेच पोलिस असे हिंदू भाविकांना लुबाडत असेल तर फडणवीस करतात काय? असा संतप्त सवाल कुंभमेळ्याला जाणारे भाविक करत आहेत. सरकारची लाज घालणार्‍या या चिरीमिरीखोर पोलिसांवर तातडीने फडणवीस यांनी कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

सविस्तर असे, की दि.१४ जानेवारीपासून उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर महाकुंभ मेळा सुरू आहे. महाराष्ट्रातील आणि कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यातील लाखो भाविक मिळेल त्या वाहनाने जात आहेत. भाविकांना नागपूर येथून रामटेक टोल नाक्यावरुन जावे लागते. नागपूर-जबलपूर-कटणी- रिवा- मंचर असा प्रवासाचा मार्ग आहे. भाविक आपल्या खाजगी वाहनाने रामटेक टोल नाक्यावर आल्यानंतर पोलिस त्यांना अडवितात. पासिंग दाखवा, लायसन्स दाखवा, सिटबेल्ट आहे का? अमुक आहे का, तमुक आहे का? असा भडिमार करून वाहकाला परेशान करतात. यावर भागले नाही तर दंड म्हणून २५ हजार रुपये भरावे लागतात. दंड भरायचा नसेल तर १० हजार रुपयांपासून खंडणी मागितली जाते. शेवटची लांबचा प्रवास असल्याने पोलिसांच्या भडिमारापुढे भाविक नतमस्तक होऊन चिरीमिरीत देऊन या हप्तेखोर पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेतात. हे केवळ महाराष्ट्रातच सुरू आहे. एकदा का महाराष्ट्र ओलांडला की जबलपूर, कटणी, रिवा, मंचर या भागातही पोलिस आहेत, परंतु तेथील पोलिस भाविकांना सहकार्य करीत मार्ग सांगतात. काही अडचण असेल तर लागलीच सहकार्य करतात. प्रयागराजपर्यंत कोणतीच अडचण येत नाही. नेमकी महाराष्ट्रातच आणि तीही हिंदुत्ववादी भाजपचा मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पोलिसांची अशी जुलमी राजवट का? महाराष्ट्रातील सरकार भाजपाचे, मध्यप्रदेशमधील सरकार भाजपाचेचं आणि उत्तरप्रदेशमधील सरकारही भाजपाचे. नेमके महाराष्ट्रात हा प्रकार का होतो? याचे आत्मपरीक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावे. आणि, मूठभर चिरीमिरीखोर पोलिसांमुळेच सगळ्या महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिमा मलीन होत असेल तर ती थांबवावी, हीच अपेक्षा महाराष्ट्रातील भाविकांची आहे.

Share This Article
Exit mobile version