– तहसीलदार संतोष काकडे यांनी साकेगाव येथे घेतला कॅम्प; शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – शेतकर्यांनी आपली फार्मर आयडी काढण्यासाठी आठ दिवसांत नोंदणी करून घ्यावी. या फार्मर आयडीमुळे पीकविमा, कर्ज, विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळेल, असे आवाहन करून नकाशावरील पांदण रस्ते खुले करण्यासंदर्भात तातडीने यादी सादर करण्याचे आदेश चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी महसूल कर्मचार्यांना दिले. तालुक्यातील साकेगाव येथे अॅग्रीस्टॅक कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तहसीलदार काकडे हे बोलत होते.
साकेगाव येथे तहसीलदार संतोष काकडे यांच्या उपस्थितीत अॅग्रीस्टॅक फार्मर आयडीबाबत शेतकरी कॅम्प झाला. त्यामध्ये अॅग्रीस्टॅक, पांदणरस्ते जीवंत ७/१२ मोहिम, ई-पीक पाहणी आदींबाबत त्यांनी ग्रामस्थ व शेतकर्यांशी संवाद साधला. फार्मर आयडी काढण्यासाठी गावातील सीएससी सेंटर, तलाठी यांच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२, ८अ, आधार संलग्न मोबाईल घेऊन जाऊन जास्तीत जास्त शेतकर्यांनी आठ दिवसांमध्ये आपली नोंदणी करुन घेण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार काकडे यांनी केले. या फार्मर आयडीमुळे शेतकर्यांना पीकविमा, पीककर्ज, विविध शासकीय योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान याबाबत ही आयडी फायदेशीर असून, यासंदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नकाशावरील पांदण रस्ते खुले करण्याबाबत मार्गदर्शन केले व नकाशानुसारचे खुले रस्ते, बंद रस्ते यांची यादी तत्काळ सादर करण्याचे तलाठी यांना आदेश दिले.
ठरलेल्या वेळापत्रकानुसार या रस्त्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल, याबाबत त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. जीवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सर्व मय्यत खातेदारांची यादी करून संबंधितांनी अर्ज, पूर्ण वारस लिहून प्रतिज्ञापत्र, स्थानिक चौकशी अहवाल, मृत्यू दाखला तलाठी यांच्याकडे सादर करण्याचेसुध्दा आवाहन तहसीलदारांनी केले. तसेच, संबंधित तलाठी यांनी प्राप्त अर्जांचे वारसांबाबत चौकशी करुन तत्काळ नोंदी घेण्याचे निर्देश दिले. गावातील सर्व शेतकरी यांनी आपल्या शेतातील ई-पीक पाहणी तत्काळ नोंदवून घ्यावी, असे सांगून उपस्थित शेतकरी व गावकर्यांशी हितगुज करून अडचणींबाबत माहिती घेतली व सदर अडचणी नियमानुसार टप्प्याटप्प्याने सोडवण्यात येईल, याबाबत आश्वस्त केले.
या कॅम्पप्रसंगी सर्वप्रथम संजय चौधरी मंडळ अधिकारी चांधई यांनी कॅम्पच्या आयोजनामागची रूपरेषा आजरोजी झालेल्या ई-पीक पाहणी, अॅग्रीस्टॅक, पांदणरस्ते, जीवंत सातबारा मोहीम याबाबतचे संकलन सादर केले व गावकरी, शेतकरी यांना मार्गदर्शन केले. सुभाष वीर ग्रामसेवक यांनी प्रस्तावना व उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी मंचावर तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह माजी सभापती श्री निकाळजे, माजी सरपंच दिलीप इंगळे, संजय चौधरी मंडळ अधिकारी, कु. प्रियंका खरात तलाठी, सुभाष वीर ग्रामसेवक, सीएससी सेंटरचे शेख अस्लम, सुनील निकाळजे पोलिस पाटील, कु. स्नेहल पारवे व बर्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी व गावकरी हजर होते.