मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती!

admin 3 Min Read
3 Min Read

– भारूडकार हभप. गोविंद महाराज गायकवाड यांचे प्रतिपादन
– भारूडातून केले समाज प्रबोधन; उपस्थितांना खळखळून हसविलेही!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आजच्या युगात आजही मुलींना कमी लेखल्या जात आहे. परंतु, मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे, असे प्रतिपादन भारूडकार हभप. गोविंद महाराज गायकवाड यांनी केले. ते सवडद येथील श्री गणेश जयंतीनिमित्त दि. ३१ डिसेंबररोजी भारूडाचा कार्यक्रम सादर करताना उपस्थित जनतेला प्रबोधन करीत होते.

भारूडकार हभप. गोविंद महाराज गायकवाड प्रबोधन करताना.

याप्रसंगी ते म्हणाले की, या भारत देशात राजा जन्माला येत असे. परंतु, प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळाल्यापासून लोकशाही अस्तित्वात आली. आता राजा ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात रयतेच राज्य होते. शेतकरी सुखी समाधानी होतो. आज शेतकरी समाधानी नाही. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव ठरविण्याचा अधिकार त्यांना नाही. नोकरदार मुलगा असेल तर मुलगी त्याला मिळते. शेतकरी मुलगा असेल तर मुलगी मिळत नाही. या देशाचा शेतकरी हा खरा राजा आहे. तो सर्वांचा पोशिंदा आहे. पण शेतकर्‍यांची अवस्था आज आपण बिकट केली आहे. मुलगी द्यायची असेल तर शेतकर्‍यांच्या मुलाला द्या, ती सुखात संसार करेल. मुलगा हा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही वंशाची पणती आहे. तिला जपून ठेवा. दान तर प्रत्येक व्यक्ती करतो पण कन्या दान करण्याचे भाग्य लागते, असे प्रतिपादन गोविंद महाराज गायकवाड यांनी केले. आजची पिढी दारू, तंबाखू , गुटखा यांच्या आहारी गेली आहे. मुलगा शाळेतून आल्यानंतर त्याच्या तोंडाचा वास घ्या! आणि तेथेच सरळ करा, असा उपदेश त्यांनी केला. तब्बल तीन तास हसत खेळत त्यांनी समाज प्रबोधन केले. यावेळी ठाणेदार गजानन करेवाड, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य अलकाताई जाधव, सरपंच गजानन देशमुख, ब्रेकिंग महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी अशोक इंगळे, उद्योगपती विकास इंगळे, अरुण देशमुख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश ठोसरे, श्रीकृष्ण तुपकर, गजानन मुंढे, गणेश डोईफोडे आदी उपस्थित होते.
काल, १ फेब्रुवारीरोजी सकाळी हभप रेणुकाताई जाधव यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर स्व.भास्करराव शिंगणे कला, नारायण गावडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब गावंडे, मुकुंद दंडे, ओमप्रकाश अग्रवाल, गाडगे महाराज यांच्याहस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सचिन खंडारे यांनी केले. रात्री शाहीर देवानंद वानखेडे आणि अशोक गवई यांच्या शाहिरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महोत्सव साजरा करताना भोजराज गाडेकर, शंकरराव देशमुख, संतोष गाडेकर व उत्सव समिती सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share This Article
Exit mobile version