समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

admin 2 Min Read
2 Min Read

– नादुरूस्त ट्रक रिव्हर्स येऊन गॅस टँकरला धडकला; चालक गंभीर जखमी
– सिंदखेडराजानजीकची नागपूर-मुंबई महामार्गावरील दुर्घटना

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – नादुरूस्त झालेला ट्रक साखळदंडाच्या सहाय्याने टोल नाक्यावर नेत असताना अचानक हा ट्रक रिव्हर्स आला. त्यामुळे पाठीमागून भरधाव येणार्‍या गॅस टँकरची व त्याची जोरदार धडक झाली. सुदैवाने गॅस टँकर रिकामा होता. तसेच, टँकर चालकाने प्रसंगावधान राखल्याने या भीषण अपघातात प्राणहानी झाली नाही. जखमी झालेल्या टँकर चालकाला द्रूतगती पथकाने (क्यूआरव्ही) अ‍ॅम्बुलन्सद्वारे रूग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती स्थीर आहे. पोलिस व क्रूआरव्ही पथकाने अपघातग्रस्त टँकर व ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला केल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरूळीत झाली.

सविस्तर असे, की आज (दि.१ फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३२८.८ मुंबई कॅरिडॉरवर नादुरूस्त झालेला ट्रक (क्रमांक एमएच ४६, बीबी ०३८६) हा त्याचा चालक प्रदीप कुमार पाल (वय २३, रा. मिर्झापूर, उत्तरप्रदेश) हा दुसर्‍या एका ट्रकच्या सहाय्याने (क्रमांक सीजी ०४ पीई ७३०१) पाठीमागून साखळदंडाने बांधून सिंदखेडराजा टोलप्लाझा येथे नेण्यात येत होता. परंतु, रस्त्यातच या ट्रकचे संतुलन बिघडले व तो वेगाने रिव्हर्स येऊ लागला. त्यामुळे पाठीमागून आलेल्या एका गॅस टँकरची व त्याची जोरदार धडक झाली. नागपूर ते मुंबईच्या मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात टँकर चालक रफिक अहमद (वय ३८, रा. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) हा गंभीर जखमी झाला. या टँकरचालकाच्या प्रसंगावधाने मोठा अपघात मात्र टळला असून, दोन्हीही वाहने क्षतीग्रस्त झाली आहेत. बचाव पथकासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्यातून बाजूने केली व वाहतूक सुरूळीत केली. जखमी वाहनचालकाला टँकरमधून बाहेर काढून त्याला सरकारी रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर महामार्ग रूग्णालयातील डॉक्टर यासीन शहा व चालक राठोड यांनी वैद्यकीय उपचार केले. सद्या या चालकाची प्रकृती स्थीर असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनास्थळी क्यूआरव्ही टीमचे श्रीकांत काळे, राहुल पवार, पृथ्वीराज राठोड यांच्यासह महामार्ग पोलिस विभागाचे पीएसआय गजानन उज्जैनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मूकेश जाधव, हरिओम काकडे व महाराष्ट्र सुरक्षा बलचे भगवान गायकवाड व इतरांनी तातडीने धाव घेऊन मदत व बचाव कार्य केले होते.

Share This Article
Exit mobile version