मुख्यमंत्री दिल्लीवारीवर अन शेतकरी वार्‍यावर!

editor 2 Min Read
2 Min Read

– राज्यात ओला दुष्काळ पडला असताना, मुख्यमंत्री सत्कार काय स्वीकारत आहेत? – अजित पवार खवळले!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यात दोघांचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्लीवारी आणि कार्यकर्त्यांच्या सत्कारातून फुरसत मिळत नाही. मुख्यमंत्री दिल्लीवारीवर आणि शेतकरी वार्‍यावर अशी राज्यात गत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात ओला दुष्काळ पडला असून, शेतकर्‍यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्री नाहीत, त्यामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांवर कुणाचा वचक नाही, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, की राज्यात दोघांचे सरकार आहे. एक महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गावोगावी सत्कार स्विकारत आहेत. कार्यकर्त्यांच्याकडून सत्कार स्विकारण्यापेक्षा राज्यातील समस्या सोडवल्या पाहिजे. सध्या जनता वार्‍यावर अशी परिस्थिती दिसून येत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल ११० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांच्या कुटुंबियांना ४ लाखाची मदत मिळाली आहे. पण इतर कोणत्याच बाबतीमधील मदत मिळालेले नाही. अनेक शेतकर्‍यांचे पशूधन दगावले आहे, घराची पडझड झाली आहे मात्र याकरिता असलेली मदत अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे केवळ आश्वासने न देता आता प्रत्यक्ष मदतीबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

राज्यात ज्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे, तेथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आम्ही केली आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उघड्यावर आले आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे आणि सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. असे असताना राज्याचे प्रश्न सोडून मुख्यमंत्री गावोगावी सत्कार घेत फिरतात.
– अजित पवार, विरोधी पक्षनेते


नुकसानीची दाहकता पाहता आतापर्यंत पंचनामे प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्रीच नसल्याने नेमके चित्र काय हेच समोर येत नाही. प्रशासकीय अधिकारी हे पंचनामे सुरु असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे अधिकृत नुकसानीचा आकडा हा येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी विश्वास ठेवायचा कुणावर, असा सवाल उपस्थित होत आहे. पंचनामे केवळ तोंडी झाले आहेत. कागदोपत्री आणखी संबंधित अधिकारी हे बांधापर्यंत पोहचलेलेच नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना मदत मिळणार तरी कशी, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Share This Article
Exit mobile version