– तपास महिला अधिकार्याकडे सोपविला, पण महिला अधिकारीच गैरहजर? – पंचायत समिती आवारात दलालांचा सुळसुळाट प्रकरण!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराला ऊत आलेला असून, सर्वसामान्य माणसाच्या कामाला या ठिकाणी काडीचीही किंमत मिळत नाही, असे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरकुल आणि विहिरीचे प्रस्ताव तयार करण्यासाठी ग्रामसेवक हे त्यांनी नेमलेल्या एजंटांमार्फत घरकुल आणि विहीर लाभार्थी यांची आर्थिक लूट करत असून, याकडे मात्र या ठिकाणचे गटविकास अधिकारी कानाडोळा करताना दिसून येत आहेत. या अगोदर पत्रकार सुरेश हुसे यांनी स्वतःच्या घरकुलासंदर्भात होणारी आर्थिक पिळवणूक पाहाता, गटविकास अधिकारी यांना तक्रार देऊनही या तक्रारीवर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. श्री हुसे यांनी आज त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी ही विस्तार अधिकारी अधिकारी शिंदे या महिला अधिकार्यांकडे देण्यात आल्याचे सांगितले. त्या मॅडम निश्चितच कारवाई करतील, असेही सांगितले. परंतु या अधिकारी गैरहज असल्याचे कळते आहे. तसेच, तक्रार दिल्यानंतर एजंटांचे प्रमाण कमी व्हायला पाहिजे. परंतु तक्रार दिल्यापासून आजपर्यंत एजंटचे प्रमाण अत्यंत जोमाने वाढले असून, याकडे मात्र संबंधित विभागाने कानाडोळा चालविला होता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना चालू केली असून, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करता येते. परंतु, या योजनेला पंचायत समितीमधील ग्रामसेवक आणि त्यांनी नियुक्त केलेल्या दलालांमुळे घरकुलाचे स्वप्न रंगवणार्या लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंदंडाला सामोरे जावे लागत आहे. सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये पत्रकार सुरेश हुसे यांच्या नावावर निमगाव या ठिकाणी घरकुल मंजूर झाले आहे. त्या घरकुलाचे करारनामे १०० रुपयाच्या बॉण्डवर करण्यासाठी व संपूर्ण कागदपत्र फाईल भरून देण्यासाठी ग्रामसेवकांनी स्वतः एजंटला भेटण्याचे सांगून त्यांच्याकडून काम करून घ्या, असे बजावले. सदर प्रकरण हे घरकुल लाभार्थ्यांचे आर्थिक लुटमारीचे असल्याचे पत्रकारांच्या लक्षात आल्यावर पत्रकार यांनी सदर घटनेची माहिती गटविकास अधिकारी सिंदखेडराजा आणि ग्रामसेवक यांना दिली. बीडिओ पंचायत समिती सिंदखेडराजा यांनी ग्रामसेवक तसेच एजंट यांच्या नावे तक्रार द्या, मी कारवाई करतो असे म्हटले आहे. मात्र आज गटविकास अधिकारी यांना केलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली, अशी विचारणा केली असता, सदर चौकशी शिंदे मॅडमकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. आता शिंदे मॅडम संबंधित ग्रामसेवकावर काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, सुरेश हुसे हे ब्रेकिंग महाराष्ट्रचे सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आहेत.