बोधेगावमध्ये पुजार्‍याची निर्घृण हत्या; गाव कडकडीत बंदची हाक!

admin 3 Min Read
3 Min Read

– शरीरावेगळे धड करून धड एकीकडे तर शीर एकीकडे फेकले!
– संशयित म्हणून एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात!

शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील दि.२६ जानेवारीपासून बेपत्ता झालेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांची निर्घृण हत्या झाल्याचे उघड झाले असून, रात्री मुंडके एका विहीर सापडले तर आज, शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुसर्‍या विहिरीत उर्वरित शरीर सापडले आहे. या घटनेमुळे बोधेगाव भागात एकच खळबळ उडाली असून, संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी गावबंदची हाक दिली आहे.

बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिर गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एकबुर्जी लगत असून, मंदिरात गेल्या १४ वर्षांपासून सेवा करत असलेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे हे दि.२६ तारखेपासून गायब झाले होते. त्यासंदर्भात एकनाथ घोरतळे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच, गुरूवारी मंदिराजवळच्या सुशीलाबाई पाटीलबा तांबे यांच्या विहिरीजवळ गुरूवारी रात्री मोठी दुर्गंधी येवू लागल्याने त्या विहिरीत पाहिले असता, त्या ठिकाणी दहातोंडे यांचे शीर (मुंडके) आढळून आले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ते मुंडके रात्री उशिरा विहिरीबाहेर काढले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तसेच भाविकांत मोठा असंतोष निर्माण झाल्याने घटनेची माहिती मिळताच आज शुक्रवारी दुपारी घटनास्थळी जिल्हा पोलिस आधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसेतज्ज्ञ आदी पथक घटनस्थळी दाखल होऊन या हत्येचा शोध घेत असतानाच, त्यानंतर आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मंदिरापासून काही अंतरावर अविनाश कदम यांच्या विहिरीत दुर्गंधी येवू लागल्याने पाहणी केली असता, दहातोंडे यांचे धड म्हणजे उर्वरित शरीर आढळून आले. मयत दहातोंडे हे मूळ नागलवाडी ता. शेवगाव येथील रहिवासी आहेत. ते विवाहित असून, त्यांना दोन मुले, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. या हत्येचा निषेध करून सखोल तपास करून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी तसेच या गंभीर घटनेचा तपास एलसीबीकडे देण्यात यावा, या मागणीसाठी विविध संघटनांनी बोधेगाव कडकडीत बंदचे आवाहन केले आहे.


या हत्येप्रकरणी संशयित म्हणून एका जणाला ताब्यात घेतले गेले असून, ही क्रूर हत्या का केली गेली, या मागचे नेमके कारण काय, आणि कोणी केली? याबाबत ग्रामस्थ व भविकात उलटसुलट चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या पहिलवानबाबा मंदिरातील मूर्तीची फोडतोड करून विटंबना झाल्याची घटना घडली होती. त्यासंदर्भात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्येच्या घटनेचा तपास लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांत रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Share This Article
Exit mobile version