– दहा क्विंटल पुरी, तीन क्विंटल वांगेभाजीच्या महाप्रसादाचे होणार वाटप
– तीन दिवसांपासून विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सवडद येथे श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून त्रीदिवसीय श्री गणेश संगीत कथासारचे आयोजन दि. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. दि. १ फेब्रुवारीरोजी गणेश जयंती असल्याने पुरी व वांगेभाजीच्या महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
अठरा महापुराणांत श्री गणेश पुराण हे एक महत्त्वाचे उपपुराण आहे. यातील सुरस कथांचे सार श्री गणेश कथा वाचक ह.भ.प. अशोक महाराज वायाळ हे सुमधुर वाणीतून मांडत आहेत. तीन दिवस रोज सकाळी ५ ते ६ काकडा भजन, ११ ते दुपारी २ व दुपारी ३ ते ५ श्री गणेश पुराण कथासार, सायंकाळी ६ वाजता श्री हरिपाठ असे कार्यक्रम सुरू आहेत. दि. ३० जानेवारी रोजी रात्री ८ ते ११ गुरूदेव सेवा भजनी मंडळ, पातुर्डा जिल्हा अकोला यांचे गीत गायन पार पडले, तर दि. ३१ जानेवारी रोजी रात्री ८.३० ते ११.३० हास्यसम्राट ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड (आळंदी देवाची) यांचे भारूड संपन्न झाले. दि. १ फेब्रुवारीरोजी सकाळी ९ ते १९ महिला कीर्तनकार ह.भ.प. रेणुकाताई जाधव (चिखली) यांचे काल्याचे कीर्तन व सकाळी ११.३० वाजता महाप्रसादाचे वाटप होईल. रात्री ८ ते १२ वाजता शाहीर देवानंद वानखेडे व शाहीर अशोक गवई यांचा शाहिरीची रात्र हा कार्यक्रम होणार आहे. सवडद येथील सिध्दीविनायक संस्थान याठिकाणी होणार्या या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक तथा ज्येष्ठ पत्रकार भोजराज गाडेकर यांनी केले आहे. पूर्वी सवडद गांवात उकिरडा आणि त्यातच दारूचे बॉक्स पुरून ठेवले जायाचे. गांवातला हा दारूचा अड्डाच होता. मात्र ग्रामस्थांनी वाढते तंटे बघता या ठिकाणी १२ डिसेंबर २०१२ रोजी गणरायाचे प्रशस्त मंदिर उभे केले आहे. परिसरातील गणेश भाविकांचे हे जागृत देवस्थान झाले आहे. सवडद शाळेच्या पाठीमागे या परिसराचा शौचालयासाठी वापर व्हायचा. दाटगर्द झाडाझुडपात उकिरडे अन यातच दारूवाले दारू पुरून ठेवायचे. कालांतराने येथे वटवृक्ष असल्याने येथे एक चौथरा उभारण्यात आला. दरम्यान, गांवात गणेशोत्सवाची प्रचंड अहमहमिका असल्याने येथेही छत्रपती गणेश मंडळाच्यावतीने गणेश स्थापना केली जायची. पाच वर्षे या ठिकाणी गणेशस्थापना होत असल्याने शेवटच्या दिवशी मिरवणुकीदरम्यान वादाची ठिणगी पडायची. वाद टाळता यावे यासाठी गणेश स्थापना बंद करून गांवात एक गाव एक गणपती ही संकल्पना रूजविण्यात आली. ग्रामस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन येथे स्थापना न करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी येथील दारूविक्री बंद करण्यात आली. ग्रामस्थांची श्रध्दा बघता यागांवात कायमस्वरूपी गणेश मंदिर असावे, यासाठी याच चौथर्यावर छोटेखानी मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
दहा क्विंटल पुरी आणि तीन क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद!
आज दि.१ फेब्रुवारी रोजी सिध्दविनायक मंदिरावर १० क्विंटल पुरी आणि ३ क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद तयार करण्यात येणार आहे. या महाप्रसादाचे वितरण काल्याच्या कीर्तनानंतर होणार आहे.

