चिखली तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ!

editor 2 Min Read
2 Min Read

– एकलारा, शेलगाव जहागीर परिसरात भीतीचे वातावरण
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील एकलारा व शेलगाव जहागीर परिसरात काल रात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या दरोडेखोरांनी भोरसा-भोरसी येथे रात्री एक वाजेच्या सुमारास शेख सत्तार शेख सरदार यांच्या घरी सशस्त्र दरोडा घालून, चाकुच्या धाकावर ५० हजारांचे दागिने व रोख ३५ हजार रुपये लुटून नेले. तर शेलगाव जहागीर येथे घर फोडून २० हजार लंपास करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांचा चिखली पोलिस तपास करत आहेत.
चिखली शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भोरसा भोरसी गावात रात्री एक वाजेच्या सुमारास दरोडेखोर घुसले. त्यांनी शेख सत्तार शेख सरदार यांच्या घरात घुसून, सत्तार यांच्या गळ्याला चाकू लावला. घरात सहा ते सात व्यक्ती होते. परंतु, दरोडेखोरांनी सर्वांना चाकूच्या धाकावर वेठीस धरले व जीवे मारण्याची धमकी दिली. ३५ हजार रुपये रोख रक्कम, ५० हजारांचे सोने-चांदीचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले. सकाळी याबाबत चिखली पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली असता, ठाणेदार अशोक लांडे व पोलिस अधिकारी शरद गिरी, बीट जमादार गीते, पाटोदाचे सरपंच किशोर सोळंकी, पोलिस पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांची पंचनामा करून श्वानामार्फत माग काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दुसर्‍या घटनेत, शेलगाव जहागीर येथील मनोहर साळवे यांच्या घरात दरोडेखोर घुसले. रात्री १० वाजेच्या सुमारास घरफोडी करून दरोडेखोरांनी २० हजार रुपये लंपास केले. या दोन्ही घटनांनी चिखली तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. दरोड्यांच्या या घटनांची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते. चिखलीचे ठाणेदार लांडे, उपनिरीक्षक सचिन चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गिते हे पुढील तपास करत आहेत.
———–

Share This Article
Exit mobile version