– दाभाडी दरोड्याचा धक्कादायक उलगडा; ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सांगितले होते हा दरोडा संशयास्पद!
– डॉ. गजानन टेकाळेने पत्नी माधुरीला झोपेच्या गोळ्या दिल्या; उशीने तोंड दाबून श्वास गुदमरून मारले!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे बसस्टँडजवळ दाताळा रोडवर राहणारे पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी दि. १८ जानेवारीरोजी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडून दरोडेखोरांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्यांच्या पत्नी डॉ. माधुरी टेकाळे यांचा निर्घृण खून केला होता तर डॉ. गजानन टेकाळे यांना बेदम मारहाण झाल्याने ते बेशुद्धावस्थेत पडले होते, अशी घटना उघडकीस आली होती. घटना घडली तेव्हा घरात पती-पत्नी दोघेच होते. सकाळी पाच वाजता दरोडा पडल्याची घटना शेजारी राहणार्या त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आली होती. परंतु, या घटनेचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला असून, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने डॉ. गजानन टेकाळे यांनीच पत्नी डॉ. माधुरी हिचा झोपेच्या गोळ्या देऊन व उशीने नाक-तोंड दाबून गुदमरून जीव घेतला असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या दरोडा संशयास्पद असल्याचे ब्रेकिंग महाराष्ट्रने पहिल्याच बातमीत स्पष्ट केले होते. पोलिसांनी मोठ्या शिताफीने व तांत्रिक सहाय्याने या घटनेचा तपास करून पती डॉ. गजानन टेकाळे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉ.गजानन टेकाडे याला अटक केली असून, त्याला आज न्यायालयासमोर उपस्थित केले जाणार आहे.
डॉ. गजानन टेकाळे हा १९ तारखेपर्यंत दवाखान्यात होता. त्यादरम्यान, पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली, त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. या मोबाईलमध्ये या तरूणीसोबतचे अश्लील फोटो व व्हिडिओ पोलिसांना सापडले. त्या एका सुतावरून स्वर्ग गाठत पोलिसांनी डॉ. गजानन टेकाळे याला ताब्यात घेऊन विचारपूस करत या खुनाचा उलगडा केला आहे.

