– बुलढाणा जिल्ह्यात नवीन २० लालपरी बसेस दाखल
– प्रवासी सेवा सुधारण्यांसह बसफेर्यांत वाढ करण्याचे एसटी प्रशासनाने नियोजन
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने बुलढाणा विभागाला २० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या या लालपरी नव्या रूपात प्रवासी सेवेत दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नाने सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाला १० बसेस उपलब्ध झाल्याने या मतदारसंघातील खेड्यापाड्यांतील बंद पडलेल्या बसेस पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मतदारसंघातील प्रवासी व शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करत असल्याची समस्या प्रवाशांनी आ. मनोज कायंदे यांच्याकडे मांडली होती. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात बस डेपोसह अतिरिक्त बसेस वाढवून देण्याची मागणीदेखील त्यानुसार आ. कायंदे यांनी केली होती. त्यामुळे अखेर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी अतिरिक्त दहा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिवहन महामंडळ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कुचेकर सर यांनी तात्काळ मान्यता देऊन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. मनोज कायंदे यांनी त्यांची भेट घेऊन आभार मानले आहेत.
दुसरीकडे, बुलढाणा विभागात सात आगार आहेत. विविध आगारात बसेसची अपुरी संख्या असल्याने बसफेर्यांचे नियोजन कोलमडत आहे. त्यामुळे बुलढाणा विभागाला परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील ५६ बसेस उपलब्ध करून द्याव्यात, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. परिवहन महामंडळाने राज्यातील विविध विभागाला स्व-मालकीच्या व खासगी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. बुलढाणा विभागाला २३ जानेवारीरोजी २० बसेस प्राप्त झाल्या आहेत. या नवीन बसेस बुलढाणा विभागीय कार्यशाळेत दाखल झाल्यानंतर स्वागत करण्यात आले. ह्या बसेसमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी सुधारित इंजिन तंत्रज्ञान, प्रवाशांसाठी चार्जिंगची सुविधा, प्रवास अधिक आरामदायी करणार्या सीट्स, तातडीच्या प्रसंगी मदतीसाठी पॅनिक बटन इतर सुविधा राहणार आहेत.

