– कवठळ यात्रेत भाविकांचा उत्साह शिगेला!
– राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्याहस्ते महाप्रसाद वितरण
– भाविकांनी घेतला २१ क्विंटल पुरी, १९ क्विंटल वागेभाजीचा महाप्रसाद!
– ४ व ५ फेब्रुवारीला भव्य शंकरपटाचेही आयोजन
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील व मेरा बुद्रूकपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कवठळ येथे सालाबादाप्रमाणे याहीवर्षी श्री कानिफनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद वितरण भाविकांच्या उत्साहात पार पडले. भव्य काठी मिरवणूक सोहळा पार पडल्यानंतर दुपारी ४ वाजता २१ क्विंटलची गहूपुरी व १९ क्विंटलच्या वांगेभाजीचा महाप्रसाद बारी पद्धतीने वितरीत करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तालुक्यातील मौजे कवठळ येथे दरवर्षी पौष अमावस्येला भव्य यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा होत असतो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या यात्रेचे विशेष आकर्षण ठरणारा काठी मिरवणूक सोहळा आज दुपारी पार पडला. चंदनपूर, काटोडा, अंत्री खेडेकर, गांगलगालव गावातील नवसाच्या काठ्या घेऊन परिसरातील अंत्री खेडेकर, मेरा बु., रोहडा, गांगलगाव व जिल्हाभरातील हजारो भाविकांना घेऊन दुपारी ४ वाजता मंदिरात आल्या. त्यानंतर लगेच उपस्थित मान्यवरांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्याहस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले. २१ क्विंटल पुरी आणि १९ क्विंटल वांग्याच्या भाजीचा हा प्रसाद तब्बल ५० हजार भाविक भक्तांनी सेवन केला. कानिफनाथ संस्थान आणि समस्त गावकरी मंडळी कवठळ यांच्यावतीने शुद्ध बिसलरीचे पाणी पिण्याची व्यवस्थासुद्धा कानिफनाथ संस्थान यांनी केली होती.
आज रात्री ८ वाजता लोकशाहीर नानाभाऊ परिहार व संच यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये गण, गौळण, लावणी, शाहिरी पोवाडे व ‘कथा कुणाची व्यथा कुणाला?’ हे वगनाट्य सादर होणार आहे. तसेच दि. ४ व ५ फेब्रुवारीला परिसरातील बैलगाडा शर्यतप्रेमीसांठी एक लाख रुपयांची जंगी लूट असलेला भव्य शंकरपटही आयोजित करण्यात आला आहे.

