– संजय गांधी निराधार योजनांसह इतर योजनांच्या फायलींचा केला निपटारा; ८०९ पैकी ६०० प्रकरणांना मिळाली मंजुरी!
– दर बुधवारी मिटिंग घेऊन करणार फायली मंजूर!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तब्बल दीड वर्षे रखडलेल्या श्रावण बाळ, संजय गांधी निराधार यासह विविध सामाजिक योजनांच्या प्रकरणांना मंजुरी देऊन तब्बल ८०९ पैकी ६०० फायली तहसीलदार अजित दिवटे यांनी निकाली काढून, गरजुंना ऑन दी स्पॉट दिलासा दिला आहे. तहसीलदारांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सिंदखेडराजा तहसीलला पहिल्यांदाच प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ तहसीलदार लाभल्याच्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहे.
सविस्तर असे, की गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना, अपंग योजना, श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांच्या अनेक फायली या तहसील कार्यालयात रखडून पडलेल्या होत्या. मंजुरी देण्याकरिता संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक झालेली असतानासुद्धा एकही मिटिंग झाली नव्हती. जवळपास दीड वर्षानंतर तत्कालीन तहसीलदार सचिन जयस्वाल यांचे निलंबन झाल्यानंतर प्रभारी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनीसुध्दा या फाईलकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले होते. आता नव्याने आलेले तहसीलदार अजित दिवटे यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवायला सुरूवात केली आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेच्या फायली दि. २१ जानेवारीरोजी झालेल्या मिटिंगमध्ये पडताळणी करून फायलींना मंजुरी दिली. तब्बल ८०९ पैकी ६०० फायली एका झटक्यात निकाली काढण्यात आल्या आहेत. ज्यांची कागदपत्रे व्यवस्थित आहेत, अशाच प्रकरणांना त्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक वृद्ध, निराधार महिला, अपंगांना आता आधार मिळणार आहे. योजनांच्या प्रकरणांना होणारा विलंब टाळण्यासाठी या प्रकरणांच्या मंजुरीसाठी समितीची बैठक दर बुधवारी घेण्याचे त्यांनी निश्चित केले आहे.
नागरिकांनी दलालांना बळी पडू नये!
याबाबत ते ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले, की तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक श्रावण बाळ, विधवा, अपंग आदी योजनांसाठी दलालांमार्फत फाईल बनवत असल्याने, त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट दलाल करीत होते. तरी या लोकांनी दलालापासून सावध राहून प्रत्यक्ष नायब तहसीलदार, तहसीलदार यांना भेटून आपल्या फाईल बनवून घ्यावी. कोणीही दलालाकडे जाऊ नये, असे आवाहनदेखील तहसीलदारांनी केले आहे.

