लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ५० लाख मतदार कसे वाढले? निवडणुकीत मतांवर दरोडा!

admin 3 Min Read
3 Min Read

– काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे निवडणूक आयोगाला जळजळीत सवाल
– उद्या जिल्हाभरात जनजागृती आंदोलन करण्याची काँग्रेसची घोषणा

बुलढाणा/चिखली (बाळू वानखेडे) – नि:ष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे, त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजप व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत ५० लाख अधिक मतदान कसे झाले? हे नवीन मतदार कोण आहेत? आम्हाला पुरावे द्या.. हे नवीन मतदार कोण आहेत, ज्यांनी येऊन मतदान केले? अशी प्रश्नांची शरबत्ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली.

राहुल बोंद्रे म्हणाले, की भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष आहेत, हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. २५ जानेवारी हा निवडणूक आयोगाचा ७५ वा स्थापना दिन आहे. पण दुर्दैवाने, महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांप्रमाणे आज भारतात निवडणुकामुक्त असतील, पण त्या निश्चितच निष्पक्ष नाहीत. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी राष्ट्रीय मतदारदिनी जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करुन जनजागृती करणार असल्याचेदेखील राहुल बोंद्रे यांनी सांगून, विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे द्यावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती पण अजून ही आकडेवारी दिलेली नाही. निवडणूक आयोगाला अशी माहिती देता येणार नाही, असा कायदाच आता केंद्रातील भाजपा सरकारने केला आहे. हा कायदा म्हणजे निवडणूक आयोग व भाजपाने मतदारांच्या मतदानावर टाकलेला दरोडा लपवण्याचा प्रकार आहे, असा आरोपही राहुल बोंद्रे यांनी केला आहे.


निवडणूक आयोगाला जिल्हा काँग्रेसचे प्रश्न..

१) दिलेली मते आणि नोंदणी केलेल्या मतदारांमध्ये झालेली प्रचंड वाढ स्पष्ट करा – लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत ५० लाख अधिक मतदान कसे झाले? हे नवीन मतदार कोण आहेत? आम्हाला पुरावे द्या.. हे नवीन मतदार कोण आहेत, ज्यांनी येऊन मतदान केले? त्यांची ओळख तपासली गेली का? ते खरेच महाराष्ट्राचे रहिवासी होते का? की ते बनावट मतदार होते? की ते इतर राज्यातील मतदार होते? या नवीन मतदारांचे आणि त्यांच्या वैधतेचे पुरावे आणि पुरावे आम्हाला द्या.
२) बूथ-निहाय डेटाबद्दल खुले आणि पारदर्शक रहा – आणि शेवटी, खुले आणि पारदर्शक व्हा आणि या सर्व नवीन मतदारांबद्दल आणि प्रत्येक बूथ आणि प्रत्येक विधानसभेत किती लोक बाहेर आले आणि मतदान केले याबद्दल सर्व माहिती उपलब्ध करा. महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक झाली आहे. तरच आपण निवडणूक आयोगाला वाढदिवसाच्या खर्‍या अर्थाने शुभेच्छा देऊ, जेव्हा निवडणूक आयोग आमच्या प्रश्नाची उत्तरे देईल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अस्वीकार्यत्यामुळे निवडणूक आयोगाने ही सर्व माहिती स्वच्छपणे समोर आणणे हेच भारताच्या आणि जगाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे आहे. तोपर्यंत आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य करणार नाही, असेही राहुल बोंद्रे यांनी सांगितले आहे.

Share This Article
Exit mobile version