– छत्रपती संभाजीनगरतील ट्रक चालकाच्या निर्घृण खुनात लोणार तालुक्यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या
– अहिल्यानगरमधील ट्रकचालकाला झोपेतच टॉमीने डोके ठेचून ठार मारले!
लोणार (वाजिद खान) – कर्जबाजारी झाल्याने ट्रक लुटण्याच्या उद्देशाने त्याने ट्रक चालकाचा खून केला. मृतदेह ट्रकमधील टूल बॉक्समध्ये टाकला. अन् ट्रक घेऊन ट्रकमधील सामान विकण्याच्या उद्देशाने तो सुसाट निघाला.. मात्र एवढ्या धावपळीतदेखील त्याचे प्रेयसीसोबत बोलणे सुरू होते. अशातच त्याचा मोबाईल स्वीचऑफ झाला.. म्हणून त्याने खून केलेल्या ट्रक चालकाच्या फोनवरून प्रेयसीसोबत गप्पा मारल्या.. या प्रेयसीसोबत मारलेल्या गप्पांवरूनच छत्रपती संभाजीनगरात या बड्या हत्याकांडाचा उलगडा झाला. ट्रक चालकाचा खून करणारा हा तरूण लोणार तालुक्यातील सुलतानपूरचा राहणार असून, त्याचे नाव गणेश वसंता पवार असे आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याचे दोन साथीदार गणेश गजानन कुटे (सुलतानपूर) आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ (रा. गायखेडा, ता.लोणार) यांनादेखील अटक केली आहे. विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगांव, अहिल्यानगर) असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
विजय राऊत यांची हत्या करणारा गणेश पवार हा ट्रकवर बदली चालक म्हणून काम करतो. तो कर्जबाजारी आहे. राऊत आणि गणेश पवार यांची कामानिमित्ताने अनेकदा भेट होत असते. दि.१९ जानेवारीला रायपूरमध्ये दोघांची भेट झाली. राऊत यांना अडीच हजार किलो लोखंडाच्या ट्रान्सपोर्ट चे काम मिळाल्याचे गणेशने पाहिले. तेव्हाच त्यांनी या लोखंडावर डल्ला मारण्याचा कट रचला. त्यासाठीच त्याने राऊत यांची हत्या केली. मात्र गणेश पवार हा त्याच्या लफडेबाज स्वभावामुळेच अडकला. प्रवासात गणेश पवारचा मोबाईल स्वीचऑफ झाला होता. त्यामुळे त्याने राऊत यांच्या फोनवरून प्रेयसीला ११ कॉल केले. पोलिस तपासात ही बाब समोर आल्यानंतर गणेशचा कारनामा समोर आला. शिवाय, टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील गणेश हा राऊत यांच्यासोबत असल्याचे कैद झाले होते.

