– एसटी महामंडळात १४.९७ टक्के भाडेवाढ; रिक्षा आणि टॅक्सी भाडेही वाढणार!
– फडणवीस सरकारकडून सर्वसामान्य माणसांच्या खिशाला जोरदार कात्री!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सामान्य नागरिकांना दणका देत, त्यांच्या खिशाला जोरदार कात्री लावली आहे. राज्यातील रस्ते वाहतूक दरात बदल करण्यात आले असून, त्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारे चालविण्यात येणार्या बस वाहतूक तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ इतक्यापुरतीच मर्यादित नाही. तर, मंबई महानगरक्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी दरातही भाडेवाड करण्यात आली आहे. संभाव्य भाडेवाड तीन रूपयांची असणार आहे. आजपासून एसटी बसची भाडेवाढ लागू होईल. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
सामान्य प्रवाशांवर होणारा परिणाम पाहता, एसटी महामंडळाच्या प्रस्तावानुसार, भाडेवाढ १४.९७ टक्के म्हणजे सरासरी १५ टक्क्यांची आहे. याचप्रमाणे, ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत ३ रुपयांची दरवाढ करण्याची मागणी केली होती. यामुळे ऑटोरिक्षाचे किमान भाडे २३ रूपये ते २६ रूपये होऊ शकते, तर टॅक्सीचे किमान भाडे २८ रूपये ते ३१ रूपये होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचार्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे वाढीव दर, तसेच सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती हे भाडेवाढीचे मुख्य कारण सांगण्यात आले आहे.
————–

