स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी आ. श्वेताताईंनी आखली दीर्घकालीन राजकीय रणनीती!

admin 5 Min Read
5 Min Read

– ग्रामीण भागावर केंद्रीत केले विशेष लक्ष; महाआघाडीतील अनेक पदाधिकारी, नेते ताईंच्या नेतृत्वात भाजपात!

चिखली (खास प्रतिनिधी) – चिखली विधानसभा मतदारसंघातून सलग दुसर्‍यांदा विजयी झाल्या असल्या तरी आमदार श्वेताताई महाले या या विजयावर फारशा खुश नसल्याचे सातत्याने जाणवत असते. खास करून कोट्यवधी रूपयांची विकासकामे करून आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या कामी पडूनदेखील त्यांना चिखली शहरातून अपेक्षित मते पडू शकली नाहीत, याचे त्यांना शल्य वाटते. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत ज्या ग्रामीण भागाने खंबीरपणे साथ दिली, त्या भागावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसून येते आहे. तसेच, चिखली तालुक्यातील परंतु सिंदखेडराजा मतदारसंघात असलेली त्यांची हक्काची २२ गावे चिखली मतदारसंघात आणण्यासाठीही त्या आता सरकार दरबारी जोमाने प्रयत्न करत असून, तसे आश्वासन विद्याधर महाले पाटील यांनी जनतेला दिलेले आहे. तसेही २०२७ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार असून, मेरा, अंचरवाडी, देऊळगाव घुबे, मिसाळवाडीसह इतर गावे चिखली मतदारसंघात समाविष्ट होणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक त्या अवघ्या तीन हजार मतांच्या फरकाने जिंकल्या असल्या तरी, २०२९च्या निवडणुकीत मात्र त्यांचा विजय हा लाखाच्याच फरकाने राहणार आहे. त्याचदृष्टीने त्यांनी आता सावध राजकीय पाऊले उचलणे सुरू केले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेस पक्षाला त्या स्थानिक पातळीवर चांगलेच भगदाड पाडत आहेत. येत्या काही महिन्यांवर आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक पाहाता, श्वेताताईंनी ही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी जोरदार रणनीती आखल्याचेही दिसून येत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार श्वेताताई महाले यांना १,०९,२१२ म्हणजे एकूण मतांच्या ४८.८८ टक्के इतकी मते पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना १,०६,०११ म्हणजे ४७.४५ टक्के मते पडली. फक्त ३ हजार २०१ मतांनी श्वेताताई विजयी झाल्या. खरे तर ही निवडणूक श्वेताताईंसाठी दमछाक करणारी ठरली. राहुल बोंद्रे यांनी जिंकण्यासाठी शर्तीचे व सर्वतोपरी राजकीय प्रयत्न केले. ताईंच्या जवळच्याच लोकांना फोडण्याचा प्रयत्न झाला. वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या, त्यांच्या माहेरील कुटुंबीयांवरही चिखलफेक केली जात होती. बुलढाणा व सिंदखेडराजा मतदारसंघातील मातब्बर राजकीय नेते ताईंच्या विरोधात उघडउघड उतरले होते. धक्कादायक बाब अशी, की चिखली शहरात कोट्यवधी रूपयांची विकासकामे करूनही शहराने त्यांना अपेक्षित अशी साथ दिली नाही. त्यामुळेच ताईंना अवघ्या ३ हजार २०१ मतांनी विजय स्वीकारावा लागला. जेव्हा, की विकासकामे आणि त्यांनी सर्वांना सोबत घेऊन केलेले विकासाचे राजकारण पाहाता, श्वेताताईंचा विजय हा किमान लाखाच्या फरकाने होईल, अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे, २०१९च्या निवडणुकीतदेखील श्वेताताई या फक्त फक्त ६ हजार ६६८ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांचे घटणारे मताधिक्य हे राजकीयदृष्ट्या चिंतेची बाब निश्चितच आहे. २०१४च्या निवडणुकीत राहुल बोंद्रे यांच्याविरोधात ४७,५२० मते घेणारे भाजपचे नेते सुरेशअप्पा खबुतरे, ३३,६९९ मते घेणारे धृपतराव सावळे, २६,९२९ मते घेणारे डॉ. प्रतापसिंह राजपूत हे नेते यावेळेस श्वेताताईंसोबत होते. हजारो कोटींची विकासकामे केली. ५० वर्षात झाली नाही इतकी प्रगती केली. तरीदेखील लाखांच्या मतांचा फरक का मिळाला नाही? याचे शल्य श्वेताताईंसह विद्याधर महाले यांना जाणवताना दिसते आहे. तथापि, तब्बल सातवेळा बोंद्रे घराण्यातील आमदार चिखली मतदारसंघातून होता, तरीही हा मतदारसंघ श्वेताताईंच्या रूपाने भाजपने राखला, ही निश्चितच मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
चिखली शहरातून श्वेताताईंना अपेक्षित साथ मिळाली नसली तरी, ग्रामीण भागाने मात्र त्यांना प्रामाणिकपणे साथ दिली. त्यामुळे यापुढे त्या आपली राजकीय रणनीती निश्चितच ग्रामीण केंद्रीत करतील, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळेच त्यांनी ग्रामीण भागात पक्ष संघटना मजबुतीवर भर दिलेला दिसतो. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षातील अनेक चांगले स्थानिक नेते त्या भाजपात घेत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय गाडेकर व त्यांच्या पत्नी सरपंच संघटनेच्या अध्यक्षा व तेल्हारा ग्रामपंचायतीच्या सरपंच किरणताई गाडेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर सोळंकी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नीलेश अंजनकर, प्रतिष्ठीत व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते पंकज कोठारी यांनी श्वेताताईंच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. या नेत्यांचा फायदा भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होणार आहे. अनेक गावातील आजी-माजी सरपंच व काँग्रेसचे पदाधिकारीदेखील ताईंच्या नेतृत्वात भाजपात येत आहेत.


अलीकडेच, सवणा, मेरासह काही गावांत आ. श्वेताताई व विद्याधर महाले यांचे कौटुंबीक सत्कार सोहळे पार पडले. मेरा बुद्रूक येथील सोहळ्यात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव तथा प्रशासकीय अधिकारी असलेले विद्याधर महाले पाटील यांनी तर मेरासह २२ गावे चिखली मतदारसंघात आणण्याचे जाहीर केले. त्याचा परिणामदेखील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगला दिसून येणार असून, २०२७ मध्ये ही गावे चिखली मतदारसंघात येण्याची शक्यता पाहाता, मेरा व अंचरवाडी सर्कलमधून श्वेताताईंचे नेतृत्व मानणारे पदाधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समितीत जाणे क्रमप्राप्त आहे. श्वेताताईंनी ज्या पद्धतीने दीर्घकालीन राजकीय व्यूहरचना आखली आहे, ती पाहाता, पुढील २०२९च्या निवडणुकीत त्या लाखाच्या फरकानेच विधानसभेत पोहोचतील, असा सार्थ अंदाज आहे.

Share This Article
Exit mobile version