– सिंदखेडराजा व बुलढाणा उपविभागाची संयुक्त कारवाई, पोलिस विभागाचे सहकार्य
– जाफ्राबाद हद्दीत पळून गेलेल्या सहा बोटींवर जाफ्राबादच्या तहसीलदारांचीही कारवाई
– बोटीवर आढळले तीन परप्रांतीय मजूर; देऊळगावराजा पोलिसांत गुन्हे दाखल
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – खडकपूर्णा धरणात बोटींच्या सहाय्याने वाळूतस्करी करणार्या वाळूमाफियांना महसूल विभागाचे दणके सुरूच असून, आजदेखील जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शोध पथकाच्या साहाय्याने खडकपूर्णा जलशयात सकाळी ९.०० वाजेपासून अवैधरित्या वाळू उपसा करणार्या बोटीची शोधमोहीम सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, व बुलढामा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या नियंत्रणामध्ये वैशाली डोंगरजाळ तहसीलदार देऊळगावराजा व संतोष काकडे तहसीलदार चिखली यांच्या पथकाच्या साहाय्याने राबवून तीन बोटी पकडण्यात आल्या. या तीनही बोटी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोटांनी उडवून पाण्यातच नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच, नजीकच्या जाफ्राबाद हद्दीत पळून गेलेल्या सहा बोटींवर जाफ्राबाद (जि. जालना) येथील तहसीलदार सारिका भगत यांनी कारवाई करून वाळूतस्करांना तिकडेही दणका दिला आहे.
खडकपूर्णा जलाशयामध्ये अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्या बोटी टाकून ज्यांच्या साहाय्याने वाळू उपसतात अशा बोटी नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात यावी, अशा प्रकारचे निर्देश जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिले आहेत. त्यानुसार आज (दि.२२) शोध पथकाने बोट व ड्रोनच्या साहाय्याने धरणाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सीनगाव जहागीर येथे ०१ फायबर बोट, ०१ छोटी इंजीन बोट आढळून आली. तसेच सदर बोटीवर छत्तीसगड राज्यातील तीन मजूर आढळून आले. या वाळूचोरी करणार्यांवर पोलिस स्टेशन देऊळगावराजा येथे ग्राम महसूल अधिकारी सीनगाव जहाँगीर मधुकर उदार यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची नावे साफीकूल शेख इरफान शेख वय ३२ वर्षे व समुल शेख नजरुल शेख वय ३४ वर्षे रा. पियारपूर ता. राधानगर, जि. साहेबगंज, राज्य छत्तीसगड आणि मीसावा करीम मो आबु बक्कर वय २५ वर्षे रा. बेगमगंज ता. राधानगर, जि. साहेबगंज, राज्य छत्तीसगड अशी आहेत. या मजुरांनी अवैधरित्या उपसा केलेली रेतीसुद्धा सदर बोटीमध्ये आढळून आली. त्यावरून या मजुराच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या तपासातून वाळूतस्करांची नावे पुढे येणार आहेत. पुढील तपास पोलिस विभाग करीत आहे. या दोन्ही बोटी जिलेटिनच्या साह्याने उडवून त्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच ड्रोनच्या साह्याने इसरूळ व बायगावच्या मध्यभागी एक बोट आढळून आली. ती बोटसुद्धा जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त करण्यात आली. अशाप्रकारे तीन बोटींवर कारवाई करण्यात आली, यामध्ये तीन बोटीची किंमत अंदाजे ३० लक्ष रुपये आहे. तसेच, यापूर्वी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी जिल्हाधिकारी जालना यांना पत्र देऊन खडकपूर्णा जलाशयातील बोटींवर संयुक्तपणे कारवाई करण्याबाबत विनंती केली होती.

