– जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वेस्थानकानजीकच्या परधाडेनजीकची भीषण रेल्वे दुर्घटना, ४० प्रवासी गंभीर जखमी
– आग लागल्याच्या अफवेने गेले नाहक बळी!
जळगाव (योगिता बारी) – भरधाव असलेल्या रेल्वेने अचानक ब्रेक लावले, त्यामुळे ठिणग्या उडाल्या व धुराळा उडाला. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशांत कुणी तरी आग लागल्याची अफवा पसरवली. परिणामी, प्रवाशांनी पटापट रेल्वेतून खाली उड्या घेतल्या. काही दुसर्या पटरीवर उभे राहिले तर काही रेल्वे रूळावर पडले. तेवढ्यात दुसर्या रूळावरून भरधाव आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेस गाडीने या प्रवाशांना काहीक्षणातच चिरडले. पाचोरा रेल्वेस्थानकानजीकच्या माहेजी ते परधाडे गावादरम्यान ही भीषण रेल्वे दुर्घटना आज (दि.२२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या दुर्देवी घटनेच कर्नाटक एक्स्प्रेसने चिरडल्याने 13 प्रवासी जागीच ठार झाले असून, ४० प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. ज्या पुष्पक एक्स्प्रेस गाडीने ब्रेक मारले ती गाडी लखनऊहून मुंबईकडे जात होती. या घटनेनंतर भुसावळ विभागाच्या रेल्वे अधिकार्यांसह बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्य सुरू केले होते. ही घटना अपघात आहे की, घातपात याबाबत वरिष्ठस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्य सरकारदेखील या घटनेवर लक्ष ठेवून असून, तातडीने मदत व बचाव कार्याला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. विशेष म्हणजे, समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने रुळावर प्रवासी असताना हॉर्नही वाजवला नसल्याचा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. कर्नाटक एक्सप्रेसने हॉर्न वाजवला असता तर कदाचित प्रवासी सावध झाले असते असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या पुष्पक एक्सप्रेसला पाचोरा रेल्वे स्थानकात आणण्यात आले आहे.
रेल्वेच्या वरिष्ठस्तरीय अधिकार्यांनी सांगितले, की पुष्पक एक्स्प्रेस गाडी ही लखनऊहून मुंबईकडे जात होती. या गाडीचे हॉट एक्सल किंवा ब्रेक बाइंडिंग (जॅम) झाल्याने गाडीतून जोरदार ठिणग्या उडाल्या. त्यामुळे चालकाने ब्रेक दाबले. जोरदार ठिणग्या व धुराळा पाहून प्रवाशांत आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबल्यानंतर पटापट गाडीतून खाली उड्या घेतल्या. त्याचवेळी कर्नाटक एक्स्प्रेस ही गाडी बेंगळुरूहून दिल्लीकडे जात होती. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तेथे अचानक वळण असल्याने भरधाव आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसने पटरीवर थांबलेल्या प्रवाशांना काही कळायच्या आत चिरडले. त्यात जवळपास ११ प्रवासी जागीच ठार झाले असून, मृतकांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तर ४० प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. या दुर्देवी घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत, मदत व बचाव कार्याला गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून, त्यांनी जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात हलवले असून, मृतदेह शासकीय रूग्णालयात हलवले आहेत. जळगावच्या खासदार स्मीता वाघ यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्याबाबत सूचना केल्यात. भुसावळ विभागाकडून आपत्कालीन रेल्वे सोडण्यात आली असून, या रेल्वेमार्गावरील रेल्वेंचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तर अपघातग्रस्त पुष्पक एक्स्प्रेसला पाचोरा रेल्वे स्थानकावर आणण्यात आले होते.
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. जखमींचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येईल. जखमींच्या नातेवाईकांना रुग्णालयात सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री गिरीष महाजन घटनास्थळी दाखल झाले असून सर्व परिस्थिती सांभाळत आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
१२ जणांचे मृतदेह हाती
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालात १२ जणांचे मृतदेह दाखल झाले. तर ५ जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२५७-२२१७१९३ या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
अफवाह फैलाया आग लगी का, इसलिए निर्दोष लोगों की जान गई, हे राम अब तू ही मालिक है,#Maharashtra#trainaccident#PushpakExpress pic.twitter.com/qmoE9ks9h2
— Er. CHAUDHARY UTTAM CHAND (@Rashtriya_123) January 22, 2025

