– मराठवाड्यातील पेन्शनधारकांनी उपस्थित राहणाचे आवाहन
– पेन्शनवाढीसह इतर मागण्यांबाबत रणनीती निश्चित होणार
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – इपीएसधारकांच्या विविध मागण्या व समस्यांवर चर्चा करण्यासाठी जालना परिसरातील इपीएस-९५ धारकांचा भव्य मेळावा बुधवार (दि.२२)रोजी गोल्डी लॉन, योगेशनगर जालना येथे आयोजित करण्यात आलेला आहे, असे जिल्हा अध्यक्ष हरिदास गणपत खेकाळे यांनी कळवले आहे. इपीएस धारकांना सद्या तुटपुंजी पेन्शन मिळत असून, त्यावर त्यांची गुजरान तर सोडाच, शुगर-बीपीची औषधेदेखील भागत नाहीत. इपीएस-९५ योजनेअंतर्गत मिळणार्या तुटपुंजी पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, वैद्यकीय सेवा मोफत मिळाव्यात, यासाठी या आंदोलनात रूपरेषा निश्चित होण्याची शक्यता आहे.
देशातील १८४ खाजगी असंघटित क्षेत्रातील ७५ लाख पेन्शनधारकांना (सहकार, जिल्हा बँका, अर्बन बँका, साखर कारखाने, वि.का.सेवा संस्था, दुध संस्था, नागरी पतपेढी, वीज महामंडळ, एसटी महामंडळ, खाजगी दवाखाना, औद्योगिक कारखाने, व प्रसार माध्यमातील कर्मचारी/पत्रकार) आदींना केवळ १००० ते ३५०० रूपये इतकी तुटपुंजी फमिली पेन्शन इपीएस-९५ योजनेअंतर्गत मिळत आहे. पेन्शनधारकांनी नोकरी कालावधीत दरमहा ४१७/-,५४१/-,१२५० रूपये अंशदान पेन्शन फंडात जमा केलेले आहे. प्रत्येक कामगारांची किमान ३० ते ३५ वर्षे सेवा झालेली आहे व त्यांचे सेवा काळामध्ये किमान २० लाख रुपये तरी अंशदान जमा झालेले आहे. यांना त्यांचे अंशदानावरील व्याजरूपी पेन्शनदेखील मिळत नाही. असे बाहेर व्याजावर पैसे ठेवले असते तरी त्यांना सध्या मिळणार्या पेंन्शनपेक्षा जास्त व्याज मिळाले असते. असे असतानादेखील त्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. त्यावर त्यांची गुजरान तर सोडाच शुगर बीपीची औषधेदेखील भागत नाहीत. इपीएस-९५ योजने अंतर्गत मिळणारी तुटपुंजी पेन्शन कमीत कमी ७५०० रूपये व महागाईभत्ता, वैद्यकीय सेवा मोफत आदी मागण्या करिता राष्ट्रीय संघर्ष समितीचे गेली ८ वर्षेपासून केंद्र सरकार, प्रा.फंड कार्यालयाशी पाठपुरावा करीत, आंदोलन, उपोषण, रस्ता रोको, मान्यवरांच्या गाठीभेटी निवेदन देणे याद्वारे प्रयत्न चालू आहेत. याच आंदोलनाची पुढील रूपरेषा जालना येथील मेळाव्यात निश्चित केली जाणार आहे.
———–

