काटे वेचणार्‍याच्या हाती फुलं लागावीत, त्याप्रमाणे ‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाला!

admin 7 Min Read
7 Min Read

– भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘जीवन गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी व्यक्त केल्या भावना
– राजेंद्र काळेंसह रामेश्वर पाटील, प्रा. बी. ए. खरात, सौ.किरणताई गाडेकर, डॉ. सौ.मनिषा राऊत यांना आदर्श जीवन गौरव पुरस्कार प्रदान
– बुलढाणा जिल्ह्याचे जलपुरूष माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, पंडितराव देशमुख, डॉ.तेजराव पाटील नरवाडे, पांडुरंग पाटील भुतेकर, एकनाथ पाटील थुट्टेंसह मान्यवरांची उपस्थिती

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – पुरस्कारांनी काम करण्याची प्रेरणा मिळते. शेणफडराव घुबे यांच्यासारख्या ऋषीतुल्य आणि कर्मयोगी व्यक्तीच्या हातून पुरस्कार मिळाला आणि जीवनात जे काही पत्रकारिता करताना करू शकलो, त्याबद्दल आता कृतकृत्य झाल्यासारखे वाटत आहे. नेहमीच काटे वेचणार्‍या हातांना गुलाबाचे फुल लागावे, असे या पुरस्कार आणि सन्मानाने झाले आहे, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार, दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी आणि ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे सल्लागार संपादक राजेंद्र काळे यांनी काढले. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, साहित्य, पत्रकारिता व आरोग्यक्षेत्रात समाजोपयोगी व उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या मान्यवर व्यक्तींना आदर्श जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सन्मान स्वीकारल्यानंतर राजेंद्र काळे बोलत होते.

भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने यावर्षी ‘दर्पण’कार तथा दैनिक ‘देशोन्नती’चे जिल्हा प्रतिनिधी, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सल्लागार संपादक राजेंद्र काळे, बुलढाणा जिल्हा सकल मराठा सद्भावना ट्रस्टचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पाटील, जेष्ठ मराठी साहित्यिक लेखक फुले-शाहू-आंबेडकर राज्यस्तरीय संमेलनाध्यक्ष प्रा. बी. ए. खरात, चिखली तालुक्यातील आदर्श गांवच्या आदर्श महिला सरपंच व सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षा सौ.किरणताई गाडेकर, बुलढाणा जिल्ह्याच्या क्षीतिजावरील उदयोन्मुख कवयित्री तथा साहित्यिका डॉ. सौ.मनिषा राऊत यांना आदर्श जीवन गौरव पुरस्काराने मान्यवरांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. संस्थेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे पुढे म्हणाले, की ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्र यत्ने करू.. शब्दची आमच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन एकमेका !’ शब्दांचा प्रवास व शब्दांच्या सहवासात पत्रकारिता करताना अनेक पुरस्कार मिळालेत, पण हा “आदर्श जीवन गौरव पुरस्कार” मिळाल्याचा वेगळा आनंद यासाठी होतो की.. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यासह पत्रकारिता क्षेत्रात “आदर्श” काम करण्याची दखल घेऊन भारत शिक्षण प्रसारक मंडळ देऊळगाव घुबे यांच्यावतीने संस्थापक अध्यक्ष संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व “लेक माझी” चळवळीतील कार्याचा गौरव या माध्यमातून झाला. राजमाता जिजाऊ माँ साहेब आदर्शाच्या जननी. त्यांच्याच जन्मोत्सव दिनी आपल्याला जाहीर झालेला ”आदर्श जीवन पुरस्कार” खऱ्याअर्थाने आदर्श आहे. पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळाले. पण अनेकदा विनोदाचा किंवा टिंगल-टवाळीचा विषय होणारी आपली साधी राहणी पुरस्कारासाठी “आदर्श” ठरली, याचा वेगळा आनंद होणे स्वाभाविक आहे. पत्रकारिता क्षेत्रात काम करतानाही आदर्श जीवन जगण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो, त्या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळ व शेणफडराव घुबे यांचे आभार मानतो.. अशी विनम्र भावना राजेंद्र काळे यांनी यावेळी व्यक्त केली.

भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेणफडराव घुबे यांनी आदर्श जीवन पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनाची भूमिका विषद केली. तळागाळात असे अनेक प्रतिभासंपन्न व गुणवान माणसं आहेत की ते फक्त आपलं कार्य निरागसपणे करित असतांना प्रसिद्धीच्या झोतात न राहता, फक्त आपलं काम करित असतात. त्यांचं कार्य कितीही उंचीचं असलं तरी प्रसारमाध्यमे अशा व्यक्तिमत्वाची सरसकट दखल घेत नाहीत, व धकाधकीच्या जीवनात सोनं ज्याप्रमाणे मातीत दडलेलं असतं किंवा गारगोटी समजून हिरा फेकून दिला जातो, तशा पद्धतीने अशी गुणवान माणसं प्रसिद्धीपासून दूर राहतात. परंतु, रत्नपारखी मात्र खर्‍या हिर्‍याची ओळख करतो, त्या पद्धतीने समाजाच्या सर्वस्तरातील गुणवंत हेरून त्यांची ओळख समाजापुढे आणून त्यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना घेता यावी, हा महत्त्वाचा उद्देश ह्या कार्यक्रमाचा असल्याचे शेणफडराव घुबे म्हणाले. उपस्थित मान्यवरांच्या जीवन कार्याचा आढावा आपल्या भाषणात घेतांना त्यांच्या कार्यामधून समाजाने प्रेरणा घ्यावी, असा उपदेश विद्यार्थ्यांना केला.

यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना रामेश्वर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की आम्हाला येथे आणून, पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले, हे खरे असले तरी शेणफडराव घुबे यांचं काम अतिशय समाजाभिमुख असून, त्यांनी आपलं जीवन खर्‍याअर्थाने समाजासाठी अर्पित केलं आहे. माजी मंत्री भारतभाऊंनी त्यांना शाळा दिली, या गावाला खडकपूर्णाचं पाणी दिलं, त्या संधीचं सोनं करित असतांना पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून गांवाबरोबरच या भागाचा आर्थिक विकास व शाळेच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात उच्चदर्जाचे विद्यार्थी घडविण्यासाठी दादांची आटोकाट धडपड असते. म्हणून त्यांचे कार्य अत्यंत उच्च असल्याचे मत रामेश्वर पाटील यांनी व्यक्त केले. आजचा सूर्योदय हा आमच्यासाठी नवी सकाळ घेऊन आला, आणि त्यामुळे आमच्या जीवनात समाजासाठी अजून योग्य काम करण्याची शक्ती स्वतःच्या जीवनाचे जीवनसार बाजूला ठेवून सतत आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी व समाजकार्य करणार्‍या लोकांची दखल घेऊन सन्मानीत करणारे शेणफडराव घुबे हे व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरवोद्गार प्रा. बी. एन. खरात यांनी काढले. पाण्याचा थेंब जोपर्यंत समुद्रात मिळत नाही, तोपर्यंत त्याचे स्वतंत्र अस्तित्व असते. असे स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारे शेणफडराव घुबे यांचे कार्य समाजासाठी ललाटभूत व प्रेरक असल्याचेही प्रा.गवई म्हणाले. डॉ.मनिषाताई राऊत यांनी आपल्या पुरस्काराला उत्तर देताना सांगितले, की शेणफराव दादासारख्या व्यक्तींनी ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी शिक्षणाची गंगा या माळरानावर सुरू केल्यामुळे परिसरामध्ये आपल्या मुलीला शिकवणारे आई-वडील जागृत झाले आहे. परंतु आजच्या काळामध्ये आई-वडिलाबरोबरच पुढे सासरीदेखील सुनेला िशकवणारे सासू-सासरे निर्माण व्हावे तरच मुलीच्या शिक्षण घेण्याच्या इच्छा पूर्ण होतील, असे मत मांडले.

यावेळी व्यासपीठावर पंडितराव देशमुख अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल चिखली, डॉ.तेजराव पाटील नरवाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग पाटील भुतेकर, शेतकरी संघटनेचे नेते एकनाथ पाटील थुट्टे, प्रकाश आबा घुबे, डी.एन.इंगळे, गजानन घाटगे पाटील, संस्थेचे संचालक डॉ.पुरूषोत्तम देवकर, सहसचिव जनार्दन पाटील घुबे, संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई घुबे, उषाताई थुट्टे, प्रा.रविंद्र देशमुख, संस्थेचे सचिव प्रा.उद्धवराव घुबे, विद्यालयाचे प्राचार्य हरिदास घुबे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी परिसरातील व गावांतील पालक आणि महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या प्रसंगी जानकीदेवी विद्यालय व रामकृष्ण इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीयस्तरावरील व राज्यस्तरावरील खेळाडूंचा तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या गुणवान विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन विक्रातसिंह राजपूत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव प्रा.उद्धवराव घुबे यांनी मानले.

Share This Article
Exit mobile version