– काम तात्काळ सुरु करण्याचे आ. मनोज कायंदे यांचे निर्देश
देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – सिंदखेडराजा तालुक्यातील धानोरा येथील विद्रुपा लघु पाटबंधारे धरणाच्या सांडव्यावरील पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार मनोज कायंदे यांनी दिली आहे. सदर कामात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचेही सहकार्य लाभले आहे.
दरम्यान, याच सांडव्यावरील पुलासाठी शेतकरी पाच, सहा वर्षांपासून लढत आहेत. पुलाच्या मागणीसाठी स्थानिक शेतकर्यांनी उपोषणाचा मार्गदेखील अवलंबविला होता. कालव्यातून पाणी सोडता येत नसल्याने शेकडो शेतकर्यांचे नुकसान होत होते तर दुसरीकडे आपल्याच शेतात जाण्यास शेकडो शेतकर्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. आता या पुलाचा प्रश्न मार्गी लागण्यास या भागातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सोडविण्यासाठी तत्परता दाखवल्याबद्दल या प्रश्नाचा पाठपुरावा करणारे बळीवंश लोकचळवळीचे नितीन कायंदे, शरद कायंदे, अशोक मोगल, खरात, दत्ता मांटे, अरुण पाखरे, वायाळ तथा धानोरावासीय शेतकरी व चांगेफळ, रूम्हना, तांदुळवाडी, सोयंदेव परिसरातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.

