– देऊळगावराजा तहसीलदारांनी दिले देऊळगावराजा व अंढेरा पोलिसांना चौकशीचे पत्र
– जिल्हाधिकार्यांच्या आक्रमक भूमिकेनंतरही खडकपूर्णातील वाळूतस्करीचा प्रश्न गंभीरच!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – खडकपूर्णा प्रकल्प तसेच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी सुरूच असून, देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात बोटींद्वारे अवैध वाळूउपसा केला जात आहे. तर या बोटींवर परराज्यातील मजूर काम करत असल्याची माहिती महसूल प्रशासनाने देऊळगावराजा व अंढेरा पोलिसांना दिली आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केली नसल्याचे कळते आहे. या परप्रांतीय मजुरांमुळे या भागात भविष्यात गुन्हेगारी कृत्य घडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. तसेच, जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी वाळूतस्करीविरोधात महसूल, आरटीओ व पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडण्याचे आदेश दिले असले तरी सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यांतून वाळूतस्करी रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.
परराज्यातील मजूर खडकपूर्णा प्रकल्पांत वाळूतस्करी करण्यासाठी आणणारे वाळूतस्कर कोण, याचाही शोध घेण्याची गरज असून, या मजुरांकडून बेकायदेशीर व अवैध व्यवसाय करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून इतरही बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृत्य घडण्याची व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोटीवरील मजुरांची तपासणी करून त्यांची ओळख पटवून त्याचा अहवाल तहसील कार्यालयास सादर करण्याचे पत्रात म्हंटले होते. तसेच,१६ डिसेंबर रोजी हे पत्र अंढेरा व देऊळगावराजा पोलिस ठाण्याला पाठविण्यात आले आहे. त्यावर आता दोन्ही ठाण्यातील पोलिस कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, या दोन्हीही पोलिसांकडून या पत्रावर अद्याप काहीच हालचाल झाली नसल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून मात्र कळते आहे.
——————

