कार्तिकी, वय वर्ष अवघं 17, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बऱ्यापैकी अशीच असू शकते. मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी आहे.
कार्तिकीचे बाबा सैन्याधिकारी होते तर आई सैन्याधिकारी आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हयामधील आरे या गावचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक हे 41 राजस्थान रायफल्स चे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांना देशाच्या शत्रूशी लढताना दि.17 नोव्हेंबर 2015 रोजी वीरमरण प्राप्त झाले. त्यावेळी कार्तिकी अवघी 10 वर्षाची होती. या कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले. मात्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती संतोष महाडिक देखील कणखर बाण्याच्या. सैन्याधिकारी पती शहीद झाल्यानंतर रडत न बसता त्यांनी अख्ख्या जगासमोर महाराष्ट्राच्या इतिहासातील राजमाता जिजाऊंच्या लढाऊ बाण्याचा आदर्श ठेवला. स्वाती महाडिक यांनी संरक्षण प्रशासनाकडे दाद मागितली आणि एका शहीद सैन्याधिकाऱ्याची पत्नी पहिल्यांदा एक सैन्याधिकारी बनण्याचा इतिहास घडला. तोदेखील स्वकर्तृत्वावर, सैन्याधिकारी बनण्यासाठीच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि त्यानंतरचे सर्व खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून…..
अशा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मानाच्या सांस्कृतिक महोत्सवात आपल्या कार्तिकीची भरतनाट्यम नृत्यकलेतील “अरंगेत्रंम्” हा विशेष प्रकार सादर करण्यासाठी निवड झाली आहे. तिच्यासोबत तिच्या सहकारी निकिता आणि अन्यना यादेखील असणार आहेत. चेन्नई येथील “कलाक्षेत्र फाईन आर्ट्स” या संस्थेच्या गुरू श्रीमती सी. के.राजलक्ष्मी आणि पंडित राजेंद्र गंगणी यांचे मोलाचे मार्गदर्शन या सर्वांना मिळाले आहे.
आज 30 जुलै 2022 रोजी कार्तिकी आपल्या डेहराडून येथील शाळेत आपली कला सादर करणार असून ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात ती आपली कला स्कॉटलंड या देशातील मधील एडिनबर्ग या शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात सादर करील. या वयात पितृछत्र हरविलेल्या भारतीय विद्यार्थिनीने आपल्या देशाचे, आपल्या शाळेचे या महोत्सवात प्रतिनिधित्व करण्याची स्वकर्तृत्वाने संधी मिळविणे, या यशाचे शब्दात वर्णन करणे तसे कठीणच आहे. एक प्रकारे कार्तिकीने वीरमरण पत्करलेल्या आपल्या वडिलांना आणि आता सध्या सैन्यात सैन्याधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या आईला आपल्या कर्तृत्वाने जणू कडक सलामीच दिली आहे ….
कार्तिकी आणि तिच्या सहकाऱ्यांना संपूर्ण भारत देशवासियांकडून लाख लाख शुभेच्छा..! जय हिंद..!

