– तहसीलदारांनी केली पाहणी; परंतु कार्यवाही शून्य, संबंधित ठेकेदारही कुणाला जुमेना!
पैठण (शिवनाथ दौंड) – तालुक्यातील ब्राम्हणगाव तांडा रस्त्याची दुर्दशा अद्यापही संपली नसून, या रस्त्याने जाताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वारंवार या रस्त्यावर अपघात घडूनही जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आजदेखील सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक रिक्षा ब्राम्हणगाव तांडाकडे जात असताना, अचानक पाणी आल्याने रिक्षा घसरली व पाण्यात वाहून जाऊ लागली. या रिक्षात चालकासह, दोन महिला व रुग्ण बसलेला होता. सुदैवाने काही दुर्देवी प्रकार घडला नाही. तांड्यावरील ग्रामस्थांनी पाण्याच्या बाहेर कशीबशी रिक्षा काढली. जिल्हा प्रशासनाला या धोकादायक रस्त्यावर काही बळी हवे आहेत का, असा संताप व्यक्त होत आहे. पैठण तहसीलदारांनी रस्त्याचा पंचनामा केला होता. परंतु, पुढे काहीही कार्यवाही केली नाही. हा रस्ता करणारा ठेकेदार एका बंडखोर राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते.

आडुळ ते ब्राह्मणगाव व ब्राह्मणगाव ते ब्राह्मणगाव तांडा रस्त्याचे काम होत का नाही? रस्ता मंजूर होऊन व त्याची कामाची तारीख देखील संपून दोन वर्षे उलटून गेलेले आहेत, तरी देखील संबंधित ठेकेदारावर कारवाई का करत नाही? या कामात हलगर्जीपणा दिसून येत आहे. या कामाचे ठेकेदार याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता व ठेकेदार रोहन जाधव यांच्या हलगर्जीपणामुळे तांड्यातील नागरिकांना जीवाशी खेळावे लागत आहे. गेल्या वर्षी देखील या रस्त्याने एका बालकाचा मृत्यू झाला होता व माता बालबाल बचावली होते. अशीच एक घटना आज 5.वा ब्राह्मणगाव तांडा येथील रस्त्यावर घडली.
उद्या लगेच कामाला सुरुवात करणार; तहसीलदारांचे आश्वासन!
दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने हे वृत्त प्रसारित करताच, पैठण तहसीलदारांनी दूरध्वनी करून, उद्या लगेच कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरु होते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

