गजानन वायाळ यांचे पक्षांतर ठरेल पायावर धोंडा!

admin 4 Min Read
4 Min Read

– डॉ. राजेंद्र शिंगणेंना मेरा सर्कलमधून मोठा लीड मिळवून देण्यात वायाळांना आले होते अपयश?
– भाजपमध्ये गेल्यास जिल्हा परिषदेत डॉ. शिंगणे वचपा काढण्याची शक्यता!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे कट्टर समर्थक गजानन वायाळ हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा तालुक्यात सुरू आहेत. डॉ. शिंगणे हे आमदार व मंत्री असताना त्यांनी वायाळ यांना राजकीय ताकद देण्याचे काम केले. त्यांच्या मेरा सर्कलमधील गावांत मोठ्या प्रमाणात निधी दिला. पक्षातील काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा विरोध असतानाही वायाळ यांना राजकीय ताकद देण्याचे काम डॉ. शिंगणे यांनी केले. पण, आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर, आणि डॉ. शिंगणे हे पराभूत झाल्यानंतर गजानन वायाळ हे त्यांना सोडत असतील, तर तो त्यांनी स्वतः पायावर दगड पाडून घेणे ठरेल, अशी चर्चा या भागात सुरू आहे. विशेष म्हणजे, इतकी मोठी ताकद देऊनही गजानन वायाळ यांना विधानसभा निवडणुकीत डॉ. शिंगणे यांना मोठा लीड देता आला नाही. त्यामुळे आधीच डॉ. शिंगणे हे त्यांच्यावर नाराज असल्याचे कळते. त्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तर डॉ. शिंगणेंना मानणारा मोठा वर्ग आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत वायाळ यांना दणका देऊ शकतो, असेही राजकीय धुरिणांचे मत आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे हे मंत्री, पालकमंत्री व आमदार असताना गजानन वायाळ यांना मोठ्या प्रमाणात राजकीय ताकद देण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी चिखली तालुक्यातील परंतु सिंदखेडराजा मतदारसंघात गावे येणार्‍या भागातील अनेक स्थानिक नेत्यांच्या नाराजीकडेही डॉ. शिंगणे यांनी दुर्लक्ष केले. वायाळ यांच्या सांगण्यानुसार, कोट्यवधीची कामे मेरासह या भागातील २२ गावांत डॉ. शिंगणे यांनी मंजूर करून कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. एवढेच नाही तर वायाळ यांना तालुक्यातून थेट जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून स्थान दिले. परंतु, विधानसभा निवडणुकीत गजानन वायाळ हे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना त्यांच्या भागातून मोठा लीड देऊ शकले नाहीत. मेरा सर्कलमधून शिंदे गटाचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर व डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात फक्त जवळपास ३०० मतांचा फरक राहिलेला आहे. त्यामुळे या भागात कोट्यवधीचा निधी देऊनही व वायाळ यांना राजकीय ताकद देऊनही मोठा लीड न मिळाल्याने डॉ. शिंगणे हे आधीच गजानन वायाळ यांच्यावर नाराज असल्याचे कळते आहे. त्यातच, आता वायाळ हे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून भाजपात जाणार असल्याच्या चर्चा या भागात सुरू आहेत. या चर्चांचे कोणतेही अधिकृत खंडन वायाळ यांनी केले नाही. त्यामुळे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे गजानन वायाळ हे वागत आहेत का? असा प्रश्न जनतेत उपस्थित होत आहे. गजानन वायाळ भाजपात गेले तरी आम्ही मात्र डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासोबतच राहू, असे स्थानिक कार्यकर्ते व डॉ. शिंगणे यांचे निष्ठावंत सांगत आहेत. ‘नवसाला पावला नाही म्हणून आम्ही देव बदलणार नाही’, अशी भूमिका कट्टर शिंगणे समर्थकांनी घेतली आहे. त्यामुळे त्याचा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही गजानन वायाळ यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.


मेरासह या भागातील २२ गावांत माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असून, गावोगावी त्यांचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. यातील अनेक गावांचे सरपंच व उपसरपंच हे डॉ. शिंगणे यांचे नेतृत्व मानणारे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार संस्था व कार्यकर्ते यांच्यात डॉ. शिंगणे यांचे नेटवर्क मोठे आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा मराठा मतांचे ध्रुवीकरणामुळे झाल्याचे या भागात सर्वश्रुत आहे. त्यामुळे या भागातील मराठा, ओबीसी व दलित मतदार हा आजही डॉ. शिंगणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अशा परिस्थितीत गजानन वायाळ हे भाजपात गेले तरी डॉ. शिंगणे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला या भागात काहीही फरक पडणार नाही, असे राजकीय धुरिणांसह सर्वसामान्य जनतेचे मत आहे.
————-

Share This Article
Exit mobile version