– ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचालकाकडे दिले बंद पाकिटात जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र
– धाराशिव जिल्ह्यात खळबळ; धनंजय सावंत यांच्यानंतर आता केशव सावंत यांनाही जीवे मारण्याची धमकी
धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी) – माजी आरोग्य मंत्री आणि शिंदे गटाचे परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख केला जाईल, अशा धमकीचे पत्र तेरणा कारखान्याचे संचालक केशव सावंत यांना मिळालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सोनारी येथील भैरवनाथ शुगर्सचे संचालक धनंजय सावंत आणि तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची ही चिठ्ठी मिळाली आहे. तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकिटात १०० रूपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली. तेरणा कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे बंद पाकीट दिले. टपाल असल्याचे सांगत बंद पाकीट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे देण्यास सांगितले. या धमकीच्या चिठ्ठीमध्ये तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, असे नमूद आहे. सदर प्रकरणानंतर तेरणा कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड व सुनील लगडे, संजय निपाणीकर यांनी ढोकी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. आता ढोकी पोलीसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकार्यांनी दिली.
विशेष म्हणजे, तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घराबाहेर विधानसभा निवडणूक काळात अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. दि. १३ सप्टेंबररोजी मध्यरात्री उशिरा ही घटना घडली होती. तेव्हापासून याप्रकरणाचा तपास सुरू असून, तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धोका असल्याचे म्हटले जात आहे.
दिनांक २२ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी मुळेवाडी पाटी येथे अज्ञात इसमाने तेरणा सहकारी साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रकाश आडे (राहणार पुसद) याकडे खाकी रंगाचे पॅकेट दिले. या पॅकेटमध्ये पांढऱ्या कागदावर पेन्सिलने धनंजय सावंत केशव सावंत यांना ‘मस्साजोग संतोष देशमुख करू’ असा मजकूर लिहिला होता. तसेच यामध्ये एक शंभराची नोटदेखील होती. दरम्यान, या प्रकरणी संजय बाबुराव निपाणीकर (वय वर्ष ४१, राहणार निपाणी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव) यांनी ढोकी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून डोकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे अधिक तपास करत आहेत.

