– लोणार येथील धक्कादायक प्रकार; रूग्ण जळत असताना ड्युटीवरील कर्मचारी झोपले होते का?
– कर्मचार्यांचा हलगर्जीपणा की आणखी काही कारण?
लोणार/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लोणार ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पैठण येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा रात्रीच्या सुमारास जळून मृत्यू झाला. पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचा अक्षरशः कोळसा झाल्याचे दिसून आले. इतकी भयानक दुर्घटना घडून, आणि एखादा रूग्ण जीवंत जळत असताना या रूग्णालयातील ड्युटीवरील कर्मचारी कोठे होते, ते इतके गाढ झोपले होते का, की त्यांना एका वयोवृद्ध रूग्णाचा आक्रोशदेखील ऐकू आला नाही, की हे कर्मचारी रुग्णालयात हजर नव्हते, अशा नाना शंकाकुशंका व्यक्त होत असून, हे अग्निकांड संशयाच्या भोवर्यात सापडले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले कर्मचारी एक तर रात्रीला झोपलेले होते किंवा रूग्णालयात तरी नव्हते, त्यामुळेच इतकी भीषण आग कधी लागली याची त्यांना माहिती झाली नसावी. कर्मचारी जागे असते तर रूग्णाचा जीव गेला नसता, अशी चर्चा ऐकायला मिळत होती. रूग्ण हा मनोरुग्ण होता व त्यांने बिडी पेटविल्यामुळे आग लागली असावी, किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शंका व्यक्त होत आहे. या थरारक तितक्याच दुर्देवी घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन खराडे हे करीत असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करीत आहेत. रूग्णाच्या नातेवाईकांचा शोध न लागल्यामुळे पोस्टमार्टम केल्यानंतर तहसीलदार यांच्या परवानगीने नगरपालिकेच्या साह्याने सदर रूग्णावर दुपारी १.१५ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगोले यांनी दिली.
अमरावतीतील मजुरांच्या अंगावर डंपर घालून चिरडले; तीन बालके ठार; सहाजण गंभीर जखमी

