– वाघोली परिसरातील केसानंद फाट्यावरील मध्यरात्रीचा थरार
– कामाधंद्यासाठी आलेले मजूर फुटपाथावर झोपले होते; दारूड्या डंपरचालकाने सरळ झोपलेल्या माणसांवर डंपर घातले!
पुणे (सोनिया नागरे) – भरधाव असलेल्या मद्यधुंद डंपरचालकाने फुटपाथवर झोपलेल्या अमरावती जिल्ह्यातील मजुरांच्या अंगावर सरळ डंपर घालून त्यांना चिरडल्याने आतापर्यंत तीन चिमुकले जागीच ठार झाले असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा थरारक अपघात घडला. केसानंद फाट्यावर ही दुर्देवी घटना घडली असून, सर्व मृतक व जखमी हे अमरावती येथील कामगार व मजूर असून, ते बिगारी कामासाठी वाघोली परिसरात आले होते. मृतक व जखमींत लहान मुले व महिलांचाही समावेश आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या मजूर कुटुंबावर काळाने असा निदर्यीपणे घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. अजितदादा हे या कुटुंबीयांना भेट देण्याची शक्यता आहे. डंपरचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
या अपघाताला बळी पडलेले पवार व इतर नावांचे हे कुटुंब अमरावती येथून वाघोली परिसरात रोजगाराच्या शोधात आले होते. कालपासून ते रोजगार शोधत फुटपाथावरच झोपत होते. महिला, लहान मुले आणि काही पुरूष असा त्यांच्या गटात समावेश होता. डोक्यावर छत नाही, खिशात पैसे नाहीत, त्यामुळे रात्र फुटपाथवर काढणार्या या कुटुंबांवर भरधाव आलेला डंपर सरळ अंगावर चढला. यामध्ये तीन चिमुकल्या बाळांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून, कुणाचे पाय तर कुणाचे हात चिरडले गेले आहेत. जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना काल (दि.२२) रात्री १२.३० ते एक वाजेच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता.
याबाबत या दुर्देवी कुटुंबातील एकाने सांगितले, की आम्ही ४० जण कामासाठी येथे पुण्याते आलो आहोत. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथे झोपल्यानंतर डंपरचालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर डंपर घातला. दुसरा एकजण म्हणाला, की आम्ही कालच अमरावतीवरून पुण्याला आलो होतो. आम्ही सर्व जण झोपलेले असताना बारा-एक वाजण्याच्या सुमारास डंपर फुटपाथवरून आत घुसल्यानंतर आरडाओरडा सुरू झाली. त्यानंतर आम्ही सगळे उठलो डंपरचालकाने मुलांना चिरडले होते. तसाच तो पुढे गेला. तर तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने सांगितले की, जर तो डंपर दुसर्या बाजूला वळला असता, तर आणखी १५-१६ जणांचा जीव गेला असता. तिथे असलेल्या अनेकांनी आरडाओरड केली, त्यामुळे अनेक जण वाचले. अन्यथा, मोठा अनर्थ झाला असता. डंपरचालकाने दारू पिलेली होती. त्यांने मुलांच्या अंगावरून वाहन घातले. पुण्यातील या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
—————-

