देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची; मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च करणार!

admin 6 Min Read
6 Min Read

– मस्साजोग येथे जाऊन शरद पवार यांनी केले संतोष देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन
– देशमुख कुटुंबीय, गावकर्‍यांनी शरद पवारांसमोर फोडला टाहो!; म्हणाले, आम्ही दहशतीत, उद्या कुणाचा नंबर लागेल सांगता येत नाही!

बीड (जिल्हा प्रतिनिधी) – माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जिल्ह्यातील मस्साजोग येथे येऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पवारांनी देशमुख कुटुंबीय आणि गावकर्‍यांशी संवाद साधून घटनाक्रमक समजून घेतला. यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. मुलीला बारामतीच्या वसतीगृहात पाठवा, मी कॉलेजपर्यंतचे सर्व शिक्षण करतो, असे शरद पवार यांनी जाहीर केले. तसेच, देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही आम्ही घेतो, असेही सांगितले. यावेळी पवारांसोबत नगरचे खासदार नीलेश लंके, बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि माजी मंत्री आ. राजेश टोपे हेदेखील उपस्थित होते. पवारांनी देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी देशमुख कुटुंबीय शरद पवारांपुढे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पवारांसमोर गावकर्‍यांचा आक्रोश पाहायला मिळाला. आम्ही सगळे भयभीत आहोत. उद्या कुणाचा नंबर लागेल, याचा नेम राहिला नाही, असे गावकरी म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही गावकर्‍यांनी यावेळी केली.

पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठे मिळाला, त्याबाबत खोटे सांगितले. माझ्या भावाला न्याय मिळायला हवा, जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे, त्यालाही अशीच शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला काहीच नको, न्याय हवाय, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांपुढे दिली. देशमुख कुटुंबीय व ग्रामस्थांचा आर्तटाहो ऐकल्यानंतर शरद पवार म्हणाले, की जे घडले आहे, त्याने सर्वसामान्य लोकांना धक्का बसला. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे लोक इथे आहेत. अशा जिल्ह्यात जे घडले ते कुणालाही न पटणारे आहे. सरपंचाची हत्या झाली. जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना यांची हत्या झाली. हे चित्र अतिशय गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा हा प्रश्न विधानभवनात मांडला. ते कोणत्या जातीचे आहेत, समाजाचे आहेत हे त्यांनी बघितले नाही. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलायला आम्ही तयार आहोत. या प्रकरणात खरा सूत्रधार कोण हे पाहून त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांनी जातमध्ये न आणता हा मुद्दा विधानसभेत मांडला. या प्रकरणी सरकारने कितीही रक्कम दिली तर गेलेला माणूस परत येत नाही. त्यांचे दु:ख कमी होऊ शकत नाही. बीडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पण, त्यातून बाहेर पडले पाहिजे. दहशतीतून बाहेर पडण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन करून पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार याप्रकरणाच्या खोलात जाईल, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशाराही दिला आहे. सरकारने १० लाख रूपयांची मदत जाहीर केल्याचे गावकर्‍यांनी शरद पवार यांना सांगितले. त्यावर पैसे बँकेत ठेवा. सेव्हिंग करा. महिन्याला व्याज मिळेल याची व्यवस्था करा. मुलीच्या शिक्षणाची काळजी करू नका, आम्ही आहोत, असे पवार म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या कर्मवीर वसतीगृहात शिक्षणासाठी यायला सांगितले. तिथे ९ हजार मुली शिकत आहेत. तूही ये. तुझा कॉलेजपर्यंतचा शिक्षणाचा खर्च मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका, असे शरद पवार म्हणाले. तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही आम्ही घेऊ, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कुटुंबातील आणि गावातील लोकांनी शरद पवार यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला. संतोष देशमुख यांनी या गावाला १९ पुरस्कार मिळवून दिले होते. एवढ्या मोठ्या माणसाला मारून टाकले. आमचं काय साहेब? आम्ही घाबरलोय, असे गावकरी म्हणाले. सरपंचाला मारणारे आरोपी आमच्या गावातील नाही. आमच्या गावातील लोग गुण्यागोविंदाने नांदतात. आमच्यात भांडण होत नाही. निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र असतो, असे गावकरी म्हणाले.
———
पीएसआयने आरोपीसोबत चहापानी घेतला
बीडचे बजरंग खासदार सोनवणे म्हणाले की, पाटील नावाचे जे पीएसआय आहेत त्यांनी बराच वेळ आरोपीसोबत चहापानी घेतल्याचे व्हिडिओ आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुळापर्यंत जाणार, पण मुळापर्यंत जाणार कधी? हा प्रश्न आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला आज १३ दिवस झाले, पण आज मुख्य आरोपीला अटक होत नाही. सात आरोपींना पकडाल पण त्यांचा जो म्होरक्या आहे, त्यांना कधी पकडलं नाही तर तो अजून ७ आरोपी तयार करेल, अशी भीती त्यांच्या लहान मुलीला पाटत आहे. या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
————-
४० मिनिटे दखलच नाही!
गावातील सरपंचाला मारहाण झाली तो व्हिडिओ आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. आरोपी त्या दिवशी आला. टोलनाक्यावर मागून गाडी आणली. बॅरिकेड लावले. मारहाण करत सरपंचाला बाजूला काढले आणि दुसर्‍या गाडीत घेऊन गेले. आम्ही तक्रार करायला गेलो. तेव्हा ४० मििनटं कुणी दखल घेतली नाही. पोलिस जागेवर नव्हते. सरपंचाची हत्या झाल्याचे कळले त्यानंतर युवराजला बोलावून पोलिसांनी सह्या घेतल्या. पोलिसांनी आरोपींसोबत चहापाणी घेतले, अशी तक्रारही त्यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालले पाहिजे. त्यासाठी निष्णांत वकील द्या. तसेच देशमुख कुटुंबीयांतील एकाला नोकरी द्या, अशी मागणीही गावकर्‍यांनी केली.


वाल्मिक कराडमुळे धनजंय मुंडे अडचणीत!

संतोष देशमुख हत्याकांडात राज्याचे कॅबिनेट मंत्री व परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. वाल्मिक कराड हे परळी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचे दिसून येतात. यापूर्वीदेखील ३०७ सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे, तर केज पोलिस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचेदेखील नाव वारंवार घेतले जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो.
————-

Share This Article
Exit mobile version