– भाजपचे १९, शिंदे गटाचे ११ व अजित पवारांच्या वाट्याला ९ मंत्रिपदे
– संजय कुटेंचा पत्ता कट, तर आकाश फुंडकरांना मंत्रिपदाची लॉटरी
– मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटात नाराजीची चर्चा
– मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक व जातीय समिकरण राखण्याचा प्रयत्न
नागपूर (स्वाती ठाकरे) – देवेंद्र फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर झाला. एकूण ३९ आमदारांना राज्यपालांनी मंत्रिपदाची पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक १९, शिंदे गटाचे ११ तर अजित पवार गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये ३३ जणांनी कॅबिनेट तर ६ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपच्या ३, शिवसेनेच्या २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. आज रात्रीपर्यंत या मंत्र्यांचे खातेवाटपदेखील जाहीर होणार आहे. या मंत्रिमंडळात बुलढाण्यातून आकाश फुंडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून, संजय कुटे यांचा पत्ता कट झाला आहे. तर पंकजा मुंडे-पालवे व धनंजय मुंडे या बहिण-भावाचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने पहिल्यांदाच मुंडे भावंडं मंत्रिमंडळात एकत्र काम करताना दिसणार आहे.
मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ हे एकमेव मुस्लीम चेहरा आहेत, तर ४ महिलांना मंत्री करण्यात आले आहे. महाराष्ट्रात तब्बल ३३ वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत म्हणजे नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी झाला. यापूर्वी २१ डिसेंबर १९९१ रोजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात विस्तार झाला होता. आज शपथ घेणार्या मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल, असे अजित पवार यांनी शपथविधीपूर्वीच सांगितले आहे. महायुतीच्या सर्व आमदारांना हा नियम लागू होणार आहे. त्यानंतर नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने एकनाथ शिंदे गटातील दिग्गज नेते नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खास करून तानाजी सावंत हेदेखील नाराज असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाचे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद मिळाल्याने नाराजी व्यक्त केली असून, भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयकपदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटाच्या आमदारांकडून अडीच वर्षांनी मंत्रिपदावरून पायउतार होणार असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेणार असल्याची माहिती समजत आहे.
– शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांची संपूर्ण यादी –
१) राधाकृष्ण विखे पाटील, भाजप
२) चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
३) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
४) चंद्रकांत पाटील, भाजप
५) गिरीश महाजन, भाजप
६) गुलाबराव पाटील, शिवसेना
७) गणेश नाईक, भाजप्
८) दादा भुसे, शिवसेना
९) संजय राठोड, शिवसेना
१०) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
११) मंगलप्रभात लोढा, भाजप
१२) उदय सामंत, शिवसेना
१३) जयकुमार रावल, भाजप
१४) पंकजा मुंडे, भाजप
१५) अतुल सावे, भाजप
१७) शंभूराज देसाई, शिवसेना
१८) आशीष शेलार, भाजप
१९) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
२०) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
२१) शिवेंद्रराजे भोसले, भाजप
२२) माणिकराव कोकाटे, भाजप
२३) जयकुमार गोरे, भाजप
२४) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
२५) संजय सावकारे, भाजप,
२६) संजय शिरसाट – शिवसेना
२७) प्रताप सरनाईक, शिवसेना
२८) भरत गोगावले, शिवसेना
२९) मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
३०) नीतेश राणे, भाजप
३१) आकाश फुंडकर, भाजप
३२) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
३३) प्रकाश आबिटकर, शिवसेना
३४) माधुरी मिसाळ, भाजप (राज्यमंत्री)
३५) आशीष जैस्वाल, शिवसेना (राज्यमंत्री)
३६) पंकज भोयर, भाजप (राज्यमंत्री)
३७) मेघना बोर्डीकर, भाजप (राज्यमंत्री)
३८) इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (राज्यमंत्री)
३९) योगेश कदम, शिवसेना (राज्यमंत्री)
———–

