शाळा व्यवस्थापन समितीची सतर्कता; सीसीटीव्ही सुरू करून घेतले, मुलांच्या खिचडीचीही केली तपासणी!

admin 1 Min Read
1 Min Read

– मेरा बुद्रूक शाळेच्या गुणवत्तेवर शाळा व्यवस्थापन समितीचे बारकाईने लक्ष

चिखली (एकनाथ माळेकर) – शाळा व्यवस्थापन समिती चांगली असेल तर शाळेच्या गुणवत्तेत सुधारणा होते, याची प्रचिती मेरा बुद्रूक येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या दक्षतेवरून दिसून येत आहे. या समिती सदस्यांमुळे शाळेचे बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले असून, या समिती सदस्यांनी आज मुलांना देण्यात येणार्‍या खिचडीचीही तपासणी करून त्यांचे गुणवत्ता निरीक्षण केले.

सविस्तर असे, की मागील दोन महिन्यापूर्वी मेरा बुद्रूक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामदास पडघान, उपाध्यक्षपदी सुरुशे तर इतर सदस्यांची निवड झाली होती. निवडीनंतर रामदास पडघान यांनी शाळेचे बंद अवस्थेमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून सुरू करून घेतले. मुलांना मिळणारा पोषण आहार चांगल्या दर्जाचा असावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. आज अचानक विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन वाटप सुरू असताना सहकार्‍यांसोबत त्यांनी शाळेला भेट दिली व स्वतः मुलांना देण्यात येणारी खिचडी खाऊन बघितली. त्यामुळे शिक्षक मंडळींची अक्षरशः तारांबळ उडाली होती. शाळेमध्ये शिकणारी मुले ही सर्व आपली घरची मुले आहेत. त्यामुळे त्यांना देण्यात येणार्‍या भोजनाचा दर्जा उत्तम ठेवावा, अशा सूचना यावेळी पडघान यांनी केल्या.

Share This Article
Exit mobile version