विरोध धाब्यावर बसवून शेळगाव आटोळ ते देऊळगाव घुबे रस्त्याचे निकृष्टदर्जाचे काम सुरूच!

admin 3 Min Read
3 Min Read

– डॉ. विकास मिसाळ यांच्या तक्रारीनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
– कामाचा दर्जा न सुधारल्यास परिसरातील सरपंचांना घेऊन सा. बां. विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा डॉ. मिसाळ यांचा इशारा
– बोगस काम सहन करणार नाही, काम बंद पाडून रस्ता रोको आंदोलनाचा ग्रामस्थांचाही इशारा

चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील शेळगाव आटोळ ते देऊळगाव घुबे या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सार्वजनिक विभागाच्यावतीने अखेर सुरू करण्यात आले असून, हे काम अतिशय निकृष्टदर्जाचे होत आहे. हे काम अतिशय खराब व इस्टिमेटप्रमाणे होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. या अधिकार्‍यांनी कामाची पाहणी केली असता, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे मान्यही केले. परंतु, त्यानंतरही कामात कोणतीही सुधारणा न होता, अतिशय खराब व निकृष्टदर्जाचे काम होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हे काम चांगल्या पद्धतीने झाले नाही तर ग्रामस्थांनी रस्त्यांवर उतरून ते बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. तसेच, अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार काम करा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात परिसरातील सरपंचांना घेऊन ठिय्या आंदोलन करू, असा इशारा डॉ. विकास मिसाळ यांनी दिला आहे. आधीच या रस्त्याने वाळूतस्करांनी धुमाकूळ घातला असल्याने रस्त्याची काही महिन्यातच वाट लागत आहे. त्यातच, हा रस्ताच अतिशय निकृष्टदर्जाचा केला गेला तर तो अवघ्या महिनाभरात उखडून जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर असे, की शेळगाव आटोळ ते देऊळगाव घुबे रस्ता रूंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने प्रगती पथावर असून, सदर काम हे निकृष्टदर्जाचे सुरू असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे लक्षात आणून दिले. त्यानंतर संबंधीत विभागाकडून रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली तेव्हा डॉ विकास मिसाळ यांचे म्हणणे खरे असून, रस्ता रूंदीकरण करण्यासाठी आवश्यक तितके खोदकाम करण्यात आले नाही. तसेच खोदकाम केलेल्या ठिकाणी कडक मुरूम टाकून दबई करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता अपूर्ण खोदकाम करून कमी जाडीचा गिट्टीचा थर टाकून पाणी न टाकता थातुरमातूर दबई करण्यात आली असल्याचे सबंधित अधिकारी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी संबंधित ठेकेदार यांना अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु त्यानंतरसुद्धा ठेकेदाराकडून अधिकारी यांच्या सूचनेला न जुमानता निकृष्टदर्जाचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे जर अशाच प्रकारचे काम सुरू राहिले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात परिसरातील सरपंच यांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलनं करण्यात येईल, असा इशारा डॉ.विकास मिसाळ यांनी संबंधित विभागाला दिला आहे.

Share This Article
Exit mobile version