हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, महापुरूष, संतांना अभिवादन करत सिद्धार्थ खरात यांनी घेतली आमदारकीची शपथ!

admin 3 Min Read
3 Min Read

– मी, सिद्धार्थ रेशमा रामभाऊ खरात शपथ घेतो की..!
– संविधानाची प्रतही होती हातात!

मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – सर्वप्रथम हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात रामभाऊ यांनी आज, दि. ८ डिसेंब रोजी, मी सिद्धार्थ रेशमा रामभाऊ खरात असे पूर्ण नाव घेत, मुंबई येथील विधिमंडळ सभागृहात विधीमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधीदरम्यान महापुरुष तसेच संतांनाही आ.खरात यांनी अभिवादन केले, यादरम्यान त्यांच्या हाती संविधानाची प्रतसुध्दा होती.

मेहकर विधानसभा मतदारसंघातून माजी जेष्ठ सनदी अधिकारी सिद्धार्थ रामभाऊ खरात हे विजय झाले असून, त्यांनी तीन टर्म आमदार राहिलेल्या शिंदे गटाच्या डॉ. संजय रायमुलकर यांचा पराभव केला. निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांचा विधिमंडळ सदस्यत्वाचा शपथविधी काल, ७ डिसेंबर व आज ८ डिसेंबररोजी मुंबई येथे विधिमंडळ सभागृहात पार पडला. त्यामध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांनीसुद्धा आज, दि.८ डिसेंबर रोजी विधानसभा सदस्यची शपथ घेतली. शपथविधीच्या सुरुवातीलाच त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. मी सिद्धार्थ रेशमा रामभाऊ खरात अशी शपथविधीची सुरुवात करत त्यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळतील सर्व संतजण तसेच इतर सर्व संतांना स्मरण केले. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या, अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील, असे म्हणत जयभीम, जय जिजाऊ, जय शिवराय, व संविधानाची प्रत दाखवत जय संविधान असेही आ.खरात शेवटी म्हणाले.


ही शपथ मतदारांच्या अखंड सेवेसाठी, उन्नतीसाठी; आ. श्वेताताई महाले यांनीही काल घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून महायुतीच्यावतीने सलग दुसर्‍यांदा विजयी झालेल्या आमदार श्वेताताई महाले यांनी काल, दि. ७ डिसेंबर रोजी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेत नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी ७ ते ९ डिसेंबरदरम्यान मुंबई येथे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळमकर यांनी सर्व सदस्यांना शपथ दिली. सभागृहात चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या श्वेताताई महाले यांनीदेखील काल सदस्यत्वाची शपथ घेतली. सलग दुसर्‍यांदा विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आ. श्वेताताई महाले यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांकडे बोलून दाखवली. ‘ महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात घेतलेली ही शपथ तुमच्या अखंड सेवेसाठी आणि उन्नतीसाठी आहे. माझ्या भावांनो, बहिणींनो, मातांनो… तुमचे कल्याण आणि तुमची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Share This Article
Exit mobile version