– ‘ईव्हीएम हटाव’चे आंदोलन देशपातळीवर नेणार; लवकरच राहुल गांधीही मारकडवाडीत येणार!
– ‘ठराव घ्या, आम्हाला द्या, आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवू’; शरद पवारांचे ग्रामस्थांना आवाहन
मारकडवाडी, जि. सोलापूर (हेमंत चौधरी) – ‘आम्हाला ईव्हीएमने मतदान नको, तो ठराव आम्हाला द्या, आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवू’, असा शब्द ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांना दिला, व मारकडवाडीतून सुरू झालेले ‘ईव्हीएम हटाव’चे आंदोलन देशपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी हेदेखील लवकरच मारकडवाडीत येणार असून, ते ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढणार असल्याची माहिती हाती आली आहे.
तर शरद पवार म्हणाले, की अमेरिका, इंग्लंडसह युरोपमधील सगळे देश बॅलेट पेपरवर मतदान घेतात. अनेक देशांनी सुरू असलेले ईव्हीएम बंद केले. त्यामुळे इथल्याही सर्व अडचणींवर एकच पर्याय असून, निवडणूक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. तुम्ही गावातले लोक इथे मॉक पोल घेणार होतात. पण पोलिसांनी बंदी घातली, असा कोणता कायदा आहे? असा सवाल शरद पवार यांनी केला. उद्या जर तुम्ही ऐकायचे नाही असा निर्णय घेतला तर? असे म्हणत शरद पवार यांनी सूचक इशारा दिला. तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी कशी लागू होऊ शकते? असा सवाल करत प्रशासनावर निशाणा साधला. तसेच त्यांनी आवाहन केले की, तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये ठराव करा. आम्हाला ईव्हीएमने मतदान नको, तो ठराव आम्हाला द्या, द्या आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवू, असेही शरद पवार यांनी याप्रसंगी सांगितले. या भाषणावेळी शरद पवारांनी मारकडवाडी गावाचे कौतुक केले. “मतदान झालं म्हणून तुम्ही समाधानी होता. पण काही निकाल आले ज्यामुळे तुमच्या मनात शंका आली. अनेकांच्या मनात शंका आली. ते अस्वस्थ झाले. त्यात दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. ही भावना लोकांच्या मनात आलं”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. ते म्हणाले पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चूक? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे? मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, इथे राजकारण आणायचं नाही, आम्हाला लोकांच्या मनातल्या शंकेचं निरसन करायचं आहे, असं पवार म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, की तुम्ही स्वत: या गावात या, लोकांना भेटा, त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल, तर त्यांना सहकार्य करा. गेले काही दिवस, आ. उत्तमराव जानकरांना झोप नाही, ते हाच मुद्दा मांडतात, मला माहिती नाही ते रात्री झोपेत काय बोलतात, असं म्हणत शरद पवारांनी मिश्किल टोलेही मारले.
मला विचारल्याशिवाय राजीनामा देऊ नका – जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले की, सरकारने पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घेतो असे सांगितले की मग मला विचारून राजीनामा द्या. राजीनामा दिल्यावर पुन्हा तुम्हीच निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. पण माझी परवानगी घेतल्यानंतर राजीनामा द्या, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आ. उत्तम जानकर यांना सुनावले.

