मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज वर्षा या शासकीय बंगल्यावर परतले आहेत. त्यांना ताप आल्याने व रक्तातील पांढर्या पेशी कमी झाल्याने ते आजारी होते. त्यामुळे ते त्यांच्या दरे या मूळगावी व ठाण्यातील घरी आराम करत होते. आज दिवसभर त्यांनी ठाण्यातील जुपिटर रूग्णालयात वैद्यकीय उपचारदेखील घेतले. दरम्यान, आज रात्री ते शिवसेना आमदारांची बैठक घेणार असून, महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीलादेखील हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उद्या, भाजप पक्षाचा विधिमंडळ गटनेता ठरणार असून, त्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत येत आहेत.
मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी फेटाळून लावली होती. त्यानंतर आज दिवसभर शिंदे यांनी वैद्यकीय उपचार घेतले. गेले चार दिवस त्यांनी आराम केल्याने त्यांची तब्येत आता ठीक आहे, असे त्यांनीच पत्रकारांना सांगितले आहे. सायंकाळच्या सुमारास ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी परतले असून, आज रात्री शिवसेना आमदारांची बैठक ते घेणार आहेत. रात्री उशिरा ही बैठक होणार असून, त्यात सरकार स्थापनेबाबत महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. दरम्यान, भाजपचे केंद्रीय निरीक्षक आज रात्री मुंबईत पोहोचत आहेत. उद्या (दि.४) भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची बैठक होणार असून, त्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निरीक्षकांवर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निश्चित करण्यासंदर्भात महत्वाची जबाबदारी सोपविलेली आहे.