आंबेडकरांची ईव्हीएमविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक!

admin 2 Min Read
2 Min Read

– स्वाक्षरी मोहिमेने आंदोलनाची सुरूवात; आंबेडकरांनी जारी केला व्हिडिओ!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभरात ईव्हीएमविरोधी जनआंदोलन उभारण्यात येणार असून, ज्याची सुरुवात स्वाक्षरी मोहिमेपासून होणार आहे. तर पुढे टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल, रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर असे सलग पंधरा दिवस राज्यभर ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असून, याबाबतचे जाहीर आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ जारी करून केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएमविरोधातील या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, आंबेडकर यांनी याआधीही ईव्हीएम प्रणालीमधील अनेक घोळ माध्यमासमोर मांडले आहेत. तर आता विधानसभा निवडणूक निकालातून चकीत करणारे आकडे समोर आले असता, वंचित आघाडीने थेट ईव्हीएमविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे.


दरम्यान, विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर काँग्रेससहीत महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी ईव्हीएमविरोधात आवाज उठवला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त करून वाढलेल्या मतांच्या टक्क्याकडे बोट दाखवत हा जनतेने दिलेला निकाल नाही, असे मत महाविकास आघाडीकडून व्यक्त करण्यात आले आहे. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला आहे.

 

Share This Article
Exit mobile version