चिखली (तालुका प्रतिनिधी) – येथील एका शेतकर्याच्या शेतात सापडलेले उपकरण हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्यानेच सोडले असल्याचे महसूल विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. लवकरच हे उपकरण प्रादेशिक हवामान विभाग नागपूर यांच्याकडे सुपूर्त केले जाणार आहे. हवामानातील बदल टिपण्यासाठी हे उपकरण विदर्भातील आकाशात सोडण्यात आले होते. ते हवामान विभागाच्या संगणकाशी कनेक्ट आहे, असेही सांगण्यात आले असून, त्यातील काही संयंत्रे कोरियन बनावटीची असल्याने त्यावर त्या भाषेतील मजकूर असल्याचेही दृष्टीपथास आलेले आहे.
सविस्तर असे, की अंचरवाडी येथील शेतकरी संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले होते. आज सोमवारी सकाळी संजय परिहार यांचा मुलगा अविनाश आणि चुलतभाऊ वैभव परिहार हे नित्यनेमानुसार कामानिमित्त शेतात गेले होते. यावेळी त्यांना दूरवरून शेतात काही तरी पडलेले दिसून आले. दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना मोठ्या फुग्याला (बलूनला) जोडलेले हे यंत्र दिसून आले. अविनाश, वैभव यांनी याची माहिती देताच गावकरी, नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, ही माहिती काही प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधींना दिली. दरम्यान, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाले. हे उपकरण हवामान खात्याने सोडले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्या उपकरणावर कोरियन भाषेत मजकूर दिसून आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. या यंत्रासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांना विचारणा केली असता, त्यांनी या सर्व बाबींचा खुलासा केला. हे हवामानविषयक उपकरण असून, आमच्या संगणक प्रणाली सोबत जोडलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे प्रादेशिक हवामान खात्याच्या नागपूर केंद्राने स्पष्ट केल्याचे संभाजी पवार यांनी सांगितले.
—-