जुगारअड्ड्यावरील छाप्यावरून ठाणेदार व एएसआयमध्ये व्हॉटसअप ग्रूपवरच जुंपली!

editor 2 Min Read
2 Min Read

व्हॉटसअपवर व्हिडिओ टाकून सहाय्यक पोलिस निरीक्षकाने दिले ठाणेदाराला आव्हान

मोताळा : खरंच जिल्ह्यात आपापर्यंत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा जुगार रेड किंवा अन्य प्रकरणातील कोणत्याही प्रकाराचा वाद व्हॉटसअप ग्रुपवर गेला नव्हता. मात्र, मोताळा शहरातील जुगार रेड प्रकरणात ६० हजार रुपये घेतल्याचा वाद व्हॉटसअप ग्रुपवर गेल्याने बोराखेडी ठाणेदार व एएसआय यांच्यात चांगलीच जुंपली असून, माझ्या जुगाराच्या रेडवर तुम्ही संशय काय घेता. ते सिध्द करुनच दाखवा, अशी पोस्ट एएसआय राजेश आगाशे यांनी मोताळ्यातील एका व्हॉटसअप ग्रुपवर टाकून बोराखेडी ठाणेदार राजेंद्र पाटील यांना एक आव्हानच दिले आहे. यामुळे मोताळा शहरात चर्चेला मोठे उधाण आले असून, यामधील खरे सत्य बाहेर यईल की, एक अनाकलनीय कोडचं बनून राहील, हे ही पाहणे गरजेचे असणार आहे.

मोताळा शहरात शुक्रवार १० जून रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेदरम्यान लोखंडे कॉम्पलेक्सजवळ एएसआय राजेश आगाशे व त्यांच्या सहकार्‍यांनी जुगार खेळतांना शे.इमान शे.ब्रद्दोदीन (वय २५) रा.मोताळा, जगदेव शंकर धुरंधर (वय ६५) रा.टाकळी, प्रकाश लक्ष्मण धुरंधर (वय ६०) रा.बोराखेडी व गजानन प्रल्हाद अढाव (वय ५५) रा.मोताळा या चार जणांना पकडून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन कार्यवाही करीत दोन मोटारसायकल ८० हजार व ३०६० रुपये, व ताशपत्ता २० रुपये असा एकूण ८३,०८० रुपयांचा माल पकडून जप्त करण्यात आला. परंतु ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी जुगार रेड प्रकरणात एएसआय राजेश आगाशे व त्यांच्या सहकार्‍यांनी ६० हजार घेतले असून, पोलिस अधीक्षकांनी तुमची चौकशी करायची सांगितली, अशी पोस्ट १२ जून रोजी आगाशे यांनीच मोताळा येथील एका ग्रुपवर टाकली. तसेच कारवाईचा व्हिडिओ पोस्ट करुन आगाशे यांनी मी पैसे घेतल्याचे सिध्द करुन दाखविण्याचे थेट आव्हानच पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना दिले आहे. जुगार धाडीमध्ये पैसे घेतले की नाही, चौकशीनंतर सिध्द होईल. परंतु यामुळे बोराखेडी पोलिसांची प्रतिमा मात्र जनमानसात मलीन झाली असून, याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देवून सदर प्रकारणातील सत्य बाहेर काढणे गरजेचे असल्याचा सूर मोताळा शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.

Share This Article
Exit mobile version