साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज देवानंद कायंदे यांनी मावळते आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा ४७०३ मतांनी पराभव केला आहे. वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या प्रचंड लाटेवर स्वार होऊन त्यांनी विजय प्राप्त केला आहे. डॉ. शिंगणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून ते जायंट किलर ठरले आहेत.
हा मतदार संघ भावनिक लवकर होतो. स्व. देवानंद कायंदे यांना खरी श्रध्दांजली अर्पण करायची असेल तर मनोज कायंदे यांना मतदान करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी प्रत्येक सभेत केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी हा एकमेव चेहरा संपूर्ण निवडणूकीची संपूर्ण धुरा सांभाळत असताना शिवसेना शिंदे गटाचे डॉ. शशिकांत खेडेकर यांनी संपलेली राष्ट्रवादी काँग्रेस काय लढत देणार! असा आरोप काझीवर केला होता. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याचे पत्रही सोशल मिडियावर टाकून डॉ. शशिकांत खेडेकर यांनी खळबळ उडवून दिली होती. परंतु, तेवढ्याच ताकदीने नाझेर काझी यांनी उत्तर दिले होते. खरंतर ही लढत जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझीविरोधात डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर हेच लढत आहे की काय असे वाटत होते. परंतु, नाझेर काझी हे शेवटपर्यंत मनोज कायंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि विजयी श्री खेचून आणली. या निवडणुकीत मनोज देवानंद कायंदे यांना ७२२५६, डॉ. शशिकांत खेडेकर यांना ५९८३८ तर डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ६७५५३ मते मिळाली. सविता मुंढे यांना १५००० मतांवर थांबावे लागले. मनोज कायंदे यांच्यामुळे या मतदारसंघाला युवा नेता मिळाला आहे, एवढे मात्र निश्चित.
‘फेक पत्रा’चा खोडसाळपणा अंगाशी येणार?; मनोज कायंदेंना सहानुभूतीची लाट!

