मतदारांच्या मनात काय?, उद्या उघड होणार!

admin 4 Min Read
4 Min Read

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात १९९५ नंतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना सर्वाधिक मतदानाची नोंद केली. तब्बल ७०.२२ मतदान करून आपला हक्क बजावला आहे. नेमका कौल कुणाला याबाबत तर्कवितर्क काढले जात असले तरी लाडक्या बहिणीचा प्रभाव की शेतकर्‍यांचा अक्रोश? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. उद्या (दि.२०) मतदारांच्या मनात काय होतं, ते उघड होणार आहे.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण ग्रामीण भागात वसलेला मतदार संघ असल्याने ९० टक्के मतदार हे शेतकरी आहेत. निवडणूकपूर्व गाठीभेटी घेतल्या असता, शेतकरीवर्गात शासनाविषयी प्रचंड रोष पाहायला मिळाला. सोयाबीनचे सतत कमी होणारे दर, कापसाला मिळणारा कवडीमोल भाव, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, बेरोजगारी, खते, बियाणे यांच्या वाढत्या किमती असा एकूण शासनाविरुद्ध रोष दिसून आला. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीच्या सरकारचे लाडकी बहीण योजना सुरु केली. तसंही पाहाता पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या जाहीर सभा असल्या की महिलांना सभेत नेल्या जात होते. त्या बदल्यात त्यांना मजुरी, चहा, नास्ता अशी व्यवस्था शासकीय यंत्रणेमार्फत पुरविल्या जात होत्या. महिला खूश असल्या की आपलं दुकान जमतं या विश्वासावर त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. प्रत्येक महिलेच्या खात्यात ७ हजार ५०० रूपये टाकून दिवाळी गोड केली. दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साहित्य दुप्पट भावाने खरेदी करावे लागले. सोयाबीनला भाव, कपाशीला खरेदीदार नाही. एकरी उत्पादन तीन क्विंटल आल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. अशा अवस्थेत दिवाळी गोड होण्याऐवजी कडवटपणा जास्तच होता. अशा स्थितीत विधानसभा निवडणूक लागली. दि. २० नोव्हेंबररोजी मतदान झाले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात ३,२२,९९५ मतदारांपैकी २,२६,८०५ ( ७०.२२ टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. १,०७,७८६ महिलांनी मतदान केले, त्यांची टक्केवारी ६९.८१ टक्के आहे. तर १,१९,०१८ पुरुष मतदारांनी मतदान केले, त्याची टक्केवारी ७०.५९ एवढी आहे. या मतदानाचा कौल कुणाला? हे उद्या, दि. २३ नोव्हेंबररोजी कळणार आहे. दोन दिवस आपल्या उमेदवाराला किती मतदान झाले याचा अंदाज बांधल्या जात होता. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ.राजेंद्र शिंगणेविरुद्ध गायत्रीताई शिंगणे हा सामना रंगणार असे वाटत होते. परंतु, होमपिचवर एकही कार्यकर्ता गायत्री शिंगणे यांचा दिसला नाही. त्यामुळे १९९५ साली शिवसेना पक्षाकडून विठ्ठल मोरे उभे होते, त्यांची जी अवस्था झाली होती तीच परिस्थिती गायत्रीची होऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे या युवा खिलाडीने नाझेर काझी यांच्याकडून राजकीय डावपेच आखले. रणांगणात एका नेत्यासारखे लढले. सामाजिक पाठबळ मिळाले आणि वडिलांच्या सहानुभूतीचा फायदासुध्दा त्यांना झाला. परंतु, मजल कुठपर्यंत मारता येईल हे सांगता येणे अशक्य असले तरी मतदारांनी चमत्कार घडविलेला असला तर ते विजयश्रीही खेचू शकतील. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी धनुष्यबाण हाती घेतला. परंतु त्यांना भाजपची साथ मिळाल्याचे दिसून आले नाही. भाजपने मनोज कायंदे यांना बळ देण्याचे काम केले असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मनोज कायंदे यांच्यासाठी फिरत होते. तेवढी सक्षम बाजू या निवडणुकीत डॉ.शशिकांत खेडेकर यांची दिसून आली नाही. केवळ मुख्यमंत्र्यांच्या बहिणी त्यांना कितपत तारणार हे पाहावे लागेल. डॉ.राजेंद्र शिंगणे हे २५ वर्षांपासून या मतदारसंघात ठाण मांडून आहेत. त्यांची जमेची बाजू मराठा, मुस्लीम, मागासवर्गीय आणि त्यांचा चाहतावर्ग ही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे आशीर्वाद आणि शासनाविरूद्ध शेतकर्‍यांचा आक्रोश ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यातच त्यांच्यावर अनेक आरोप झाले. विकासकामांचा चेहरा त्यांच्याजवळ नाही. लोकांना भेटणं दूर त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत नाही. मोजक्याच कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरतात, सुतगिरणी सुरू करण्यात अक्षम, साखर कारखाना मोडतोड करून विक्री काढला, असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले. तरी ते डगमगले नाही आणि लढत राहिले. मतदारांनी आपला मतदानाचा कौल मतपेटीतून दिला आहे. मतदारांचा हा कौल नेमका काय होता, हे आता उद्याच कळणार आहे.

Share This Article
Exit mobile version