– श्री गजानन, जय गजाननाच्या जयघोषाने लोणार नगरी दुमदुमली
लोणार (रामेश्वर आघाव) – पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी भूवैकुंठ पंढरपूरला गेलेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु असून, या पालखी सोहळ्याचे जगप्रसिद्ध लोणार नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी श्री गजानन, जय गजाननाच्या जयघोषाने लोणार नगरी दुमदुमून गेली होती. यावेळी आकाशभाऊ मित्र मंडळाच्यावतीने वारकरी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले होते. भाविक-भक्तांनी श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. हा पालखी सोहळा लोणार नगरीत मुक्कामी थांबला असून, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष यामुळे हे ऐतिहासिक शहर भारावून गेले आहे. उद्या सकाळी पालखी सोहळा सुलतानपूरकडे मार्गस्थ होणार आहे. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम होती.

————
श्रींच्या पालखीचे लोणार नगरीत जल्लोषात स्वागत

