चिखली (तालुका प्रतिनिधी) – जीवनदान हे जगातले सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण माणूस जीवंत राहिला तरच तो पुढचे आयुष्य उपभोगू शकेल. असे जीवनदान देणारी व्यक्ती ही देवदूतच ठरते. अशी देवदूताची भूमिका आ. श्वेताताई महाले यांनी वठवली आणि चिमुकल्या अक्षताची ब्रेन ट्यूमरच्या पाशवी विळख्यातून मुक्तता केली. योगायोगाने दि.१२ नोव्हेंबररोजी आपल्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या जनआशीर्वाद दौर्यादरम्यान आ. श्वेताताई महाले ह्या वैरागड येथे आल्या असता, तेथील प्रचार फेरीमध्ये गावातल्या इतर महिलांप्रमाणे चिमुकल्या अक्षतानेसुद्धा श्वेताताईंचे औक्षण करून त्यांचे स्वागत करत, ताईंना बहुमताने विजयासाठी शुभेच्छा दिल्या. श्वेताताईंनी केलेल्या अनमोल सहकार्याची ही अक्षदाकडून मंगलमय परतफेडच म्हणावी लागेल.
राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेतलेल्या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील नेत्या असलेल्या आ. श्वेताताई महाले यांची संवेदनशीलता यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आजवर श्वेताताई महाले यांनी अनेक असाध्य व दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण अपघातामध्ये शेवटच्या घटका मोजणारे नागरिक अशी जीवन मरणाची झुंज देणार्या रुग्णांना नवजीवन प्रदान केले, त्यांच्यासाठी श्वेताताई देवदूत ठरल्या. मुख्यमंत्री सहायता निधीतून १९३ रुग्णांवर तर सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट आदी विविध धर्मदाय संस्थांच्या माध्यमातून २०१ रुग्णांवर महाराष्ट्रातील सर्व सुविधांनी युक्त असलेल्या अद्यावत रुग्णालयात महागडे औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया केल्या. याशिवाय, विविध लहान मोठ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या एक हजारापेक्षा अधिक रुग्णांना औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी आ.श्वेताताई महाले यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. श्वेताताईंचे हे कार्य पाहता, त्यांच्यासाठी देवदूत ही उपमा अनाठायी ठरणार नाही. या मानवतेच्या कार्यातून श्वेताताईंनी गोरगरिबांचे अमूल्य असे आशीर्वाद मिळवले असून, ही पुण्याई निश्चितच त्यांच्या राजकीय वाटचालीस फलदायी ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

