– शेतकरी नेते रविकांत तुपकरांसह शेतकरी चळवळीच्या पाठिंब्यामुळे ऋतुजा चव्हाणांचे बळ वाढले!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व वंचित, उपेक्षित समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर – लोणार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी मतदारसंघात विद्यमान आमदार तथा शिंदे गटाचे शिवसेना-महायुतीचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासमोर मोठे जबरदस्त आव्हान निर्माण केले आहे. दोन शिवसेनेच्या टोकाच्या लढतीत डॉ. चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीदेखील ऋतुजा चव्हाण यांच्याच पथ्यावर पडणार आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत असून, मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप ऋतुजा चव्हाण यांनी मतदारांसमोर मांडलेला आहे. आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरल्याने ही लढत आता अटळ असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
गावोगावी मिळतोय जोरदार पाठिंबा!
शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण यांच्यासह डॉ. ऋतुजा चव्हाण यांचे गावभेट दौरे सुरू असून, या दौर्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गावखेड्यातील मायमाऊल्या ऋतुजाताईंच्या चेहर्यावरून हात फिरवत त्यांना विजयासाठी मायेचा आशीर्वाद देत आहेत. यंदा कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवायचेच, असा निर्धार मतदारांनीच केला असून, ही निवडणूक त्यांच्यावतीने लोकांनीच हाती घेतल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे, दोन शिवसेनेच्या लढाईत कट्टर शिवसैनिक व कार्यकर्ता होरपळला असून, ठाकरे गटाचे नेते शिंदे गटाच्या उमेदवाराला गद्दार म्हणून तीव्र विरोध करत आहेत. तर शिंदे गटाचे नेते आम्हीच कट्टर शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. तसेच, ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांना उपरा म्हणून त्यांच्याच गटातील नाराज पदाधिकारी विरोधक करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराला वैतागलेली जनता नवा व फ्रेश चेहरा, तसेच विकासाचे व्हिजन असलेले सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांना आपला पाठिंबा देत आहेत.

