– कु. गायत्री शिंगणे अपक्ष लढणार? की अजितदादांच्या गटात जाऊन ‘घड्याळ’ हाती घेणार?
– शरद पवारांच्या भरवश्यावर सख्ख्या काकांशी उभे वैर, हीच कु. गायत्री शिंगणे यांची राजकीय चूक!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षप्रवेशामुळे सिंदखेडराजा मतदारसंघ आज दिवसभर राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी आपली फिल्डिंग आता टाईट करण्यास सुरूवात केली आहे. डॉ. शिंगणेंच्या घरवापसीमुळे महायुतीचा उमेदवार कोण? यात खलबते सुरू झाली आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि भाजपचे डॉ. सुनील कायंदे हे दोघे आघाडीवर आहेत. त्यात अॅड. नाझेर काझी यांनी आपला दावाही कायम असल्याचे सांगितल्याने राजकीय वातावरण सद्या चांगलेच गरम आहे. दुसरीकडे, कु. गायत्री शिंगणे यांनीदेखील बंडाचे निशाण फडकावले असून, त्या आता अपक्ष लढणार की, अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन घड्याळ हाती बांधणार हे आता पहावे लागणार आहे.
मागील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्ष फॅक्टर बाजूला ठेवून जात फॅक्टर राबविल्याने सिंदखेडराजा पंचायत समितीमधील पाच जिल्हा परिषद सर्कलपैकी एकाच ठिकाणी भाजपला यश आले होते. बाकी ठिकाणी शिवसेना उमेदवाराला पाठबळ मिळाले नाही. ती नाराजी आजही मतदार संघात आहे. याचा सामना भाजपला करावा लागेल. भूतकाळात केलेल्या चुका भविष्यकाळात या मतदारसंघात उफाळून येतात. साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजप उमेदवार यांना डावलून काँग्रेस उमेदवार यांना सहकार्य करणे, शिवसेना उमेदवाराला मतदान न करणे, या मागील काही चुका भाजप नेतृत्वाला डोकेदुखी ठरणार आहे. पक्षाचे आदेश कितपत पाळले जातात, यावर विजयाचे गणित ठरणार आहे. डॉ. शिंगणे यांच्या शरद पवार यांच्यासोबत जाण्याने महाआघाडीला सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातच नाही तर जिल्हाभरात बळकटी आली आहे. यानिमित्ताने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते, काँग्रेसचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉ. शिंगणे, माजी आ. रेखाताई खेडेकर यांच्यासह इतर प्रबळ नेत्यांमुळे जिल्ह्यातील सर्वच जागांवर महाआघाडीला फायदा होणार आहे.
राजकीय कारकिर्दीची सुरूवात आमदारकीपासून नाही तर जिल्हा परिषदेपासून करणे, हेच त्यांच्यासाठी हिताचे राहील, असे राजकीय वर्तुळातून चर्चिले जात आहे. शरद पवार यांचे राजकारण पुरेसे समजल्यानंतरच त्यांनी आमदारकीच्या आखाड्यात उतरावे, असेही सांगितले जात आहे.

