– गृहमंत्र्यांनी शेतकर्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कारवाई करावी : राहुल बोंद्रे
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली विधानसभा मतदारसंघातील तीन हजार शेतकर्यांचे मागण्यांचे रक्ताचे निवेदन दि. १९ सप्टेंबरला बुलढाणा येथे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आलो असता, पोलिस प्रशासनाकडून माझी व सहकार्यांची अडवणूक करण्यात आली. जबरदस्तीने शेतकर्यांच्या रक्ताचे निवदेन हिसकावून जिल्हा पोलीस प्रशासनाने फाडले. हा शेतकर्यांच्या रक्ताचा घोर अपमान असल्याने गृहमंत्र्यांनी शेतकर्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कडक कारवाई करावी, यासाठी आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे सोमवार, दि. २३ सप्टेंबरपासून आम्ही शेतकर्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. गृहमंत्री व पोलीस प्रशासनाने त्यांच्या केलेल्या शेतकरीविरोधी कृत्यासाठी माफी मागेपर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी सांगितले.
—-
दिवसभरात आंदोलनाला १ हजार शेतकर्यांच्या भेटी
गोरगरिबांच्या सेवेत आयुष्य अर्पण केलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करून, शेतकर्यांच्या रक्ताचा अपमान केल्याच्या व शेतकर्यांवर दडपशाही करणार्या सरकारच्या निषेधार्थ आदर्शगाव सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलनाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाला २३ सप्टेंबररोजी १ हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी भेटी देवून आपला पाठिंबा दर्शविला आहे, तर आंदोलनस्थळी महाविकास आघाडीचे चिखली मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकीकडे शेतकर्यांच्या रक्ताचा जाब विचारात राहुल बोंद्रे व शेतकरी हे अन्नत्याग उपोषण करत असताना दुसरीकडे त्यांच्याविरोधात राजकीय खेळी करत, सावरगाव डुकरे येथील काही कार्यकर्ते हे उपोषणाला बसल्याची चर्चा आहे. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा सहकारी बँकेचे ९४ कोटी रूपये थकीत कर्ज त्वरित भरावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी करत उपोषण सुरू केले आहे. पवन डुकरे, संतोष काळे, अमोल डुकरे यांचे हे उपोषण आंदोलन म्हणजे शेतकरीहिताच्या मागण्यांकडून दुर्लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा तालुक्यातील शेतकरीवर्गातून ऐकू येत आहे.
———–

