– रस्त्याच्या मधोमध पोल तसेच ठेवले; नाली बांधकामही अर्धवट; वरचेवर खडी पसरवून बोगस काम सुरू!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील शेंदुर्जन येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्टदर्जाचे होत असून, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. याबाबत बुलढाणा कार्यकारी अभित्यांकडे लेखी तक्रार केली होती. परंतु, ते संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. या कामाचा फलकदेखील लावला गेला नसून, अधिकारी हे ठेकेदाराशी मिलीभगत करून असल्याने रस्त्याचे काम अतिशय दर्जाहीन सुरू आहे. या कामाची तातडीने शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, तसेच सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीसह शिवसेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे. तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पांडुरंग शिंगणे व शिवसेनेचे स्थानिक नेते दामूअण्णा शिंगणे यांनी सविस्तर निवेदनच सादर केलेले आहे.
मौजे शेंदुर्जन (ता.सिंदखेडराजा) येथे सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत रस्ता रूंदीकरण आणि मजबुतीकरण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या बाजूला पहिले इलेक्ट्रिक खांब होते ते इलेक्ट्रिक खांब जसेच्या तसेच आहेत व ते मधोमध असतांना सदर रस्त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच सदर कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, अंदाज पत्रकाप्रमाणे काम होणे आवश्यक आहे.

